
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात आज गौरी गणपतींना गणेशभक्तांनी निरोप दिला. वाजत-गाजत ढोल ताशांच्या गजरात आज गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख १ हजार ३२९ घरगुती गणेशमूर्ती आणि २३ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
२७ ऑगस्टला गणपती बाप्पांचे वाजत गाजत आगमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६९ हजार ४२६ घरगुती आणि १२६ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली. ३१ ऑगस्ट रोजी गौराईचे आगमन झाले. आज सात दिवसांनी गौरीगणपतीचे वाजत-गाजत विसर्जन करण्यात आले. आज दुपार नंतर विसर्जनाला सुरूवात झाली.
रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर गणपतीबाप्पाचे आगमन झाल्यावर त्याठिकाणी गणपती बाप्पाची पूजा-अर्चा व आरती करण्यात आली. बाप्पाला नमस्कार करून पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त घालत गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगरपरिषदेकडून निर्माल्य गोळा करण्यात येत होते.