गुहागर शहरात चिनी वस्तूंची होळी करत शिवसेना, युवासेनेकडून चीनचा निषेध

हिंदुस्थान-चीन सीमेवर लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशात झालेल्या संघर्षात 20 जवान शहीद झाले. तर हिंदुस्थानी जवानांनी चीनला चोख प्रत्युत्तर देत त्यांच्या 40 सैनिकांना यमसदनी पाठवले. जवानांच्या या शौर्याबद्दल त्यांचे देशभरतून कौतुक होत आहे. तसेच चीनचा निषेध करण्यात येत आहे.

गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर शहर शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे रविवारी गुहागर बाजारपेठ येथे चीनी बनावटीच्या वस्तूची होळी करून चीनच्या विरोधात तीव्र निदर्शन करण्यात आली. चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले. तसेच चीनविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख निलेश मोरे, उपशहरप्रमुख मनीष मोरे, नगरसेवक दीपक कनगुटकर यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या