आमदार विजय भांबळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने आंदोलन

462

सामना प्रतिनिधी । परभणी

जिंतूर नगर परिषदेतील कर्मचारी दत्तराव तळेकर यांना घरी बोलावून बेदम मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्या सांगण्यावरून खोटी अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे. ही अ‍ॅट्रॉसिटी रद्द करावी. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांना अटक करण्यात यावी. या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करून बेमुदत उपोषण करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे यांनी शुक्रवार, ५ जुलै रोजी जिंतूर नगरपालिकेचे कर्मचारी दत्तराव तळेकर यांना घरी बोलाविले आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण सुद्धा केली. याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. परंतु या तक्रारीवरून गुन्हा दाखल न करता, उलट आमदार भांबळे यांच्या सांगण्यावरुन दत्तराव तळेकर यांच्यावर खोटी अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे दत्तराव तळेकर आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड भयभित झाले आहेत. यापूर्वी देखील आमदार भांबळे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात आणि कर्मचाऱ्यांमध्ये तहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळीच आवर घालण्यातय यावा, तसेच राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांना अटक करण्यात यावी. तसेच त्यांच्या सांगण्यावरुन करण्यात आलेली खोटी अ‍ॅट्रॉसिटी रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

यावेळी आमदार विजय भांबळे यांना अटक करा, खोटी अ‍ॅट्रॉसिटी रद्द करा आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडळा. आंदोलनस्थळी संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, अरुण पवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर सोळुंके, नारायण देशमुख, प्रेम आवचार, रवी तांबे, सुभाष चव्हाण, राजेश बालटकर, सोनू पवार, आकाश डोंबे, दौलत शिंदे, नरहरी पाते, भागवत कदम, सतीश टाक आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या