परळी तालुक्यात राखेच्या प्रदूषणाविरुद्ध आंदोलनाला सुरुवात; महिलांनी केला रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकदा निवेदन देऊन कुठलीच कारवाई न केल्याने आता परळी तालुक्यातील नागरिक राखेचे प्रदूषण रोखण्यासाठी आक्रमक झाले आहेत. औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या प्रदूषणामुळे तसेच नियमांची पायमल्ली करून होत असलेल्या अवैध राख वाहतुक व वीटभट्टयांच्या प्रदूषनामुळे परळी शहर व तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत.

प्रदूषणामुळे अनेकांना श्वसन संस्थेच्या निगडित आजारांना तोंड द्यावे लागत आहे. औष्णिक विद्युत केंद्र परिसरात शेतातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रशासनाला जाग यावी म्हणून शुक्रवारी दादाहरी वडगाव येथील शेकडो महिला, ग्रामस्थांनी परळी-गंगाखेड या मार्गावर तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी वाहतूक व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला होता.

परळी शहर व परिसरातील अनेक गावांना औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या प्रदूषणामुळे तसेच नियमांची पायमल्ली करणार्‍या अवैद्य राख वाहतूक व वीटभट्टयामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. ही राख नागरिकांच्या नाकातोंडात जात असून अनेकांना श्वसन संस्थेशी निगडित आजारांचा सामना करण्याची वेळ आली आहे.या राखेच्या वाहतुकीमुळे परळी-गंगाखेड रस्त्यावर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत

या सर्व प्रकाराला वैतागून दादाहरी वडगाव येथील ग्रामस्थांनी शिवसेना नेते शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे परळी-गंगाखेड या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था दीड तास खोळंबली होती. यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. परळीच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आवाड, नायब तहसीलदार बी.एल.रुपनर यांनी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला. यानंतर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे – शिवसेना नेते शिवाजी शिंदे
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या प्रदूषणामुळे तसेच अवैधरित्या होत असलेल्या राख वाहतुकीमुळे व वीटभट्टी यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. अनेकांना या प्रदूषणामुळे श्वसन संस्थेशी निगडित आजारांचा सामना करावा लागत असून दादाहरी वडगाव येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या होत असलेल्या प्रदूषणाकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसेच बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी लक्ष घालावे अशी मागणी त्यानी केली आहे.