‘घर फिरले की घराचे वासेदेखील फिरतात’ याचा प्रत्यक्ष अनुभव आता भाजपला येण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा #ElectionResults नंतर मोदी सरकारच्या जागी आता NDA ला जनतेनं कौल दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच सरकार बनण्याआधीच नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ पहिल्या दोनपेक्षा खूप वेगळा असेल हे दिसायला सुरुवात झाली आहे. जनता दल युनायटेड JD(U) च्या एका सर्वोच्च नेत्यानं म्हटलं आहे की, पक्ष सशस्त्र दलांमध्ये भरतीसाठी केंद्राच्या अग्निवीर योजनेचा आढावा घेणार आहे.
केसी त्यागी, भाजपच्या मित्रपक्ष जेडीयूचे मुख्य प्रवक्ते आणि त्याचे प्रमुख नितीश कुमार यांच्या जवळचे सहकारी यांनी म्हटलं आहे की, ‘अनेक राज्यांमध्ये या योजनेच्या विरोधात नाराजी आहे. नाराजी आहे, त्यामुळे आम्ही अग्निवीरचा आढावा घेणार आहोत. आमचा त्याला विरोध नाही, पण पुनर्विचार होणे आवश्यक आहे’, असं ते म्हणाले.
2022 मध्ये अग्निवीर योजना आणण्यात आली होती. या योजनेअंतर्गत, 17.5 वर्षे-21 वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी समाविष्ट केले जाते. यातील 25 टक्के भरती आणखी 15 वर्षे कायम ठेवण्याची तरतूद आहे.
देशव्यापी जात निहाय सर्वेक्षण झालं पाहिजे आणि बिहारला विशेष दर्जा मिळाला पाहिजे, अशी मागणीही या ज्येष्ठ नेत्यानं केली आहे. विशेष म्हणजे, देशव्यापी जात निहाय सर्वेक्षण हे देशाच्या विरोधी पक्षांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक होते. तसेच, जेडीयूने NDAशी हातमिळवणी करण्यापूर्वी आरजेडी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर असलेल्या नितीश कुमार सरकारने राज्यात जात निहाय सर्वेक्षण केलं होतं.