
संत्रा फळबागेच्या रखडलेल्या अनुदानाचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱया शेतकऱ्याला कृषी अधिकाऱयाने चक्क बुटाने मारहाण केल्याची संतापजनक घटना वाशीमच्या मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून शेतकऱयांसह राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
माहितीनुसार, गोगरी येथील ऋषिकेश पवार नामक शेतकऱयाने दोन वर्षांपूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान मागील चार महिन्यांपासून रखडले आहे. पवार यांनी याविषयी तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांना जाब विचारला. यावेळी व्हिडीओ काढण्यावरून वाद झाला आणि कांबळे यांनी पवार यांना थेट बुटाने व ढेकळाने मारहाण केली. कृषी अधिकारी कांबळे यांनी शेतकऱयाला खोटय़ा गुह्यात अडकवण्याची धमकीही दिली.
महायुती सरकारमध्ये कवडीचीही लाज उरली नाही
या घटनेवर संताप व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, या भ्रष्ट युतीच्या सरकारमध्ये कवडीचीही लाज उरलेली नाही, तीच स्थिती यांच्या सरकारी बाबूंची आहे. चार महिन्यांपासून रखडलेल्या अनुदानाबद्दल कृषी अधिकाऱयाला विचारणा केली असता अधिकाऱयाने शेतकऱयाला बुटाने मारहाण केली. याच शेतकऱयाने कृषी अधिकाऱयाला बुटाने मारहाण केली असती तर… या मुजोर अधिकारी व यांचे मंत्रालयातील एसी रूममध्ये खुर्च्या उबवणारे मंत्रीमहोदय यांनी लक्षात ठेवावे शेतकऱयांना एवढंही गृहीत धरू नका. एक दिवस असा येईल की, तुम्हाला जीव हातात घेऊन स्वतःचं रक्षण करावं लागेल, असेही ते म्हणाले.
























































