
निमगाव वाघा तसेच पारनेर, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यात 5 ठिकाणी चोऱ्या, घरफोड्या करणारी चौघांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली आहे. या टोळीतील आणखी तिघे फरार आहेत. पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 2 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चंद्या पिंपळ्या भोसले (वय – 47), राकेश चंद्या भोसले (वय – 21, रा. घोसपुरी, ता. नगर), अर्जुन संभाजी काळे (वय – 20), गोपीचंद चंद्या काळे (वय – 19, रा. कंदर, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील जयंत केदार यांच्या घरातून 23 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मालणकर, प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक नेमले होते.
सदर पथक 3 जून रोजी गुन्ह्याचा तपास करीत असताना हा गुन्हा चंद्या पिंपळ्या भोसले याने त्याच्या साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली. तसेच ही टोळी अरणगाव शिवारात रेल्वे पटरीजवळ थांबल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. या टोळीतील शकल्या सुरेश भोसले (रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी), सफ्या रुस्तम चव्हाण (रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी), रोहित चाचा भोसले (रा. सय्यदमीर लोणी, ता. आष्टी, जि. बीड) हे फरार आहेत.
आरोपी चंद्या भोसले याच्याकडे विचारपूस केली असता त्याने साथीदारांसह अहिल्यानगर, पारनेर, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यात चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी 2 लाख 84 हजार रुपये किमतीचे 33.7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना मुद्देमालासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.