दरात सुधारणा नसल्याने कांदा उत्पादक धास्तावले

अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा मार्च महिन्यात निघाला. सुरुवातीला कांद्याला 10 ते 11 रुपये दर मिळत होता, तर मार्केटमध्ये 15 रुपये दर मिळाला. त्यामुळे थोडय़ाफार शेतकऱ्यांनी कांदा विकला व उर्वरित शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीत बंदिस्त करून ठेवला. आता तीन महिने उलटून गेले, तरी अपेक्षित चांगला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

कर्नाटक, बंगळुरू, हैदराबाद या भागांतून महाराष्ट्रातील कांद्याला चांगली मागणी असते; पण त्यांच्याकडेदेखील आता लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी होणार आहे. त्यामुळे दरही कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

यंदा महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 टक्के कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यात कर्नाटकात कमी पाऊस झाला तर लाल कांदा मार्केटमध्ये येण्यास वेळ लागून महाराष्ट्रातील कांद्याला भाव कमी मिळू शकतो, असे कांदा अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. पण कर्नाटकात जर पावसाचे प्रमाण अधिक राहिले तर तेथील कांदा उत्पादनात घट येऊ शकते. पावसाचे प्रमाण जास्त राहिले तर निश्चितच महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढून दरात मोठी उसळीदेखील येऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

भाव वाढण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा जरी चाळीत बंदिस्त केला असला, तरी त्यात सुरुवातीला उन्हाळ्याच्या झळा, त्यानंतर अवकाळी पाऊस, त्यानंतर ऊन आणि अतिगारवा यांमुळे कांदा लवकर खराब होत आहे. त्यात जवळपास तीन महिने उलटूनदेखील दर वाढण्याऐवजी कमी होत आहेत. साठविलेला कांद्यामध्येदेखील घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. कांदा ठेवला तर खराब होण्याची भीती व मार्केटमध्ये विकला तर भाव कमी यामुळे शेतकरी च्ंिातेत आहेत.

कांद्याचे भाव जून महिन्यात जवळपास 17 ते 18 रुपयांपर्यंत गेले होते. भाव वाढत आहेत, असा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला. थोडय़ाफार शेतकऱ्यांनी आहे ते दर पदरात पाडून घेतले. पण आता कांदादर 18 रुपयांवरून 12 रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यात काही कांद्यालाच हा दर मिळत आहे. जवळपास सहा रुपयांनी दर कमी झाल्याने आर्थिकदृष्टय़ा नुकसानदेखील होत आहे. कारण सगळ्यात खर्चिक पीक म्हणून कांदापिकाकडे पाहिले जाते. त्यातच भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

‘नाफेड’ कांदा खरेदी करणार, पण कधी?

n ज्यावेळी महाराष्ट्रातील कांद्याला मागणी असते, तेव्हा केंद्र सरकारकडून निर्यात धोरण शुल्क उठविले जात नाही. त्यामुळे कांद्याचे भाव वाढत नाहीत. ‘नाफेड’ कांदा खरेदी करणार, पण कधी? कारण जून महिन्यातच ‘नाफेड’मार्फत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जाईल, असे सांगितले जात होते. पण जून-जुलै महिना संपले तरीदेखील नाफेडकडून कांदाखरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे साठविलेला कांदा खराब होत असल्यामुळे शेतकरी कांदा मार्केटमध्ये आणत आहेत. त्यातच कांद्याचे भाव घसरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.