5 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण; अहिल्यानगरातील 1360 गावांतील साडेआठ लाख शेतकरी बाधित

अहिल्यानगर जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमध्ये 1 हजार 360 गावांतील 8 लाख 37 हजार 955 शेतकऱ्यांचे 5 लाख 78 हजार 822 हेक्टरवरील पिके, फळबागा यांचे मोठे नुकसान झाले. तसेच मनुष्यहानी, पशुधनासोबत घरांचे, विहिरींचे, जनावरांचे गोठे, शेतजमिनीसह अन्य शासकीय मालमत्तांचे नुकसान झाले. कृषी विभागाने जिल्ह्यातील 5 लाख 10 हजार हेक्टरवरील 90 टक्क्यांपर्यंत क्षेत्राचे पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित बाधित शेती आणि क्षेत्राचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना भरपाईचे निकष आणि रकमेत बदल केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अनेक तालुक्यांत अतिवृष्टी झाली. यात 14 तालुक्यांतील गावांना कमी-अधिक प्रमाणात फटका बसला आहे. अतिवृष्टीचा सर्वांत मोठा फटका पाथर्डी तालुक्याला बसला आहे. पाथर्डीतील 137 गावांना, तर सर्वांत कमी अकोले तालुक्यातील 31 गावांत पावसाने नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील 100 टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत. तर सर्वांत कमी पंचनामे पारनेर तालुक्यातील 130 गावांतील 35 हजार 500 हेक्टरवरील 59.46 टक्के झाले आहेत. उर्वरित ठिकाणी पंचनाम्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, राज्य सरकारने पंचनामे आणि भरपाईच्या निकषात काही बदल केले आहेत. जिल्ह्यात राज्य सरकारच्या सुधारित निकषाप्रमाणे जादा हेक्टर क्षेत्र नावावर असणाऱया शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. तसेच कृषी विभागाचे नुकसान झालेल्या शेतकऱयाचे नाव, त्याचे क्षेत्र, पिकांचे 33 टक्के अथवा 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, याची खातरजमा करणार आहे. जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या एकूण बाधित शेतकऱ्यांच्या शेतीच्या 90 टक्क्यांपर्यंत पंचनामे पूर्ण झाले आहेत.

आतापर्यंत झालेले पंचनामे

अहिल्यानगर 51 हजार हेक्टर (91.5 टक्के), पारनेर 35 हजार 500 हेक्टर (59.46 टक्के), पाथर्डी 71 हजार हेक्टर (92.46), कर्जत 32 हजार 645 हेक्टर (100), जामखेड 33 हजार 800 हेक्टर (98.47), श्रीगोंदा 38 हजार 498 हेक्टर (100), श्रीरामपूर 33 हजार 350 हेक्टर (94.49), राहुरी 42 हजार 410 हेक्टर (95.22), नेवासा 52 हजार हेक्टर (97.65), शेवगाव 55 हजार 700 हेक्टर (91.77), संगमनेर 9 हजार 100 हेक्टर (71.61), अकोले 590 हेक्टर (66.73), कोपरगाव 22 हजार (66.59), आणि राहाता 29 हजार 356 हेक्टर (73.24 टक्के) पंचनामे झालेले आहेत.

या पिकांचे नुकसान

अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसात सोयाबीन, ऊस, तूर, मूग, उडीद, सुर्यफूल, मका, कापूस, बाजरी, केळी, फुलपिके, लिंबू, कांदा, भाजीपाला या पिकांचे 50 टक्क्यांच्या जवळपास नुकसान झालेले आहे.