Ahilyanagar News – बायको नांदायला येत नव्हती, नवऱ्याने चार मुलांसह उचललं टोकाचं पाऊल

अहिल्यानगरमधील राहाता तालुक्यामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बायको नांदायला येत नाही या कारणावरून नवऱ्याने चार मुलांसह आत्महत्या केल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहाता तालुक्यातील कोहाळे शिवारात अरुण काळे (30) पत्नी आणि चार मुलांसह राहत होते. परंतु वाद झाल्यामुळे आठ दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेली होती. पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्यामुळे अरुण काळे संतापले आणि त्यांनी एक मुलगी व तीन मुलांना विहरीत ढकलून दिलं आणि त्यानंतर स्वत:ही हातपाय बांधून विहीरीत उडी मारली. या घटनेत पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस व ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन जणांचा अजूनही शोध सुरू आहे. मृतांमध्ये कबीर अरुण काळे (5), वीर अरुण काळे (6),प्रेम अरुण काळे (7), शिवानी अरुण काळे (8) या चार मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मृत अरुण काळे यांचा एक हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेची नोंद राहाता पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.