
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात, तर दहावी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहेत. यंदा प्रथमच बोर्डाने लेखीपरीक्षांप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षा पारदर्शक व्हावी, यासाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या भरारी पथकाला शाळांमधील लॅब, प्रयोगशाळेचे फोटो, जर्नल, विद्यार्थी प्रयोग करतानाचे फोटो बोर्डाला पाठवावे लागणार आहेत.
10वी, 12वी परीक्षेच्या केंद्रांवरील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत आणि परीक्षेवेळी शाळा परिसरात ड्रोन वापरला जाणार आहे. लेखी परीक्षेवेळी पर्यवेक्षकांमध्येही सरमिसळ (आपल्या शाळेचे विद्यार्थी ज्या केंद्रावर नाहीत तेथे पर्यवेक्षक) असणार आहेत. तत्पूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षेतही बोर्डाने लक्ष घातले आहे. प्रत्येक शाळेवर जाणाऱ्या बहिस्थः परीक्षकांची नावे बोर्डाकडूनच अंतिम केली जाणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी अचानक भेटी देणाऱ्या भरारी पथकात गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी असणार आहेत.
लॅब, प्रयोगशाळेचे फोटो पाठवावे लागणार
प्रात्यक्षिक परीक्षेवेळी शाळांना भेटी देणाऱ्या भरारी पथकाने नेमकी काय माहिती पडताळायची, याचा नमुना बोर्डाने संबंधितांना दिला आहे. त्या शाळेत अद्ययावत लॅब आहे का, प्रयोगशाळेत प्रयोग होतात का, विद्यार्थ्यांनी जर्नल व्यवस्थित पूर्ण केली आहेत का, अशा बाबी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी तपासायच्या आहेत. त्यानंतर त्याचे जीओ टॅग फोटो बोर्डाला पाठवायचे असल्याचे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले.
प्रयोगशाळा कशी असावी याचे मार्गदर्शन
दहावी आणि बारावीच्या प्रात्याक्षिक परीक्षा पारदर्शकपणे व्हाव्यात, यासाठी विभागीय अध्यक्ष औदुंबर उकीरडे यांनी नियोजन केले आहे. या वर्षीपासून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी संबंधित शाळांमधील लॅब (प्रयोगशाळा) कशी असावी, याबाबत पुण्यावरून ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले आहे. यानुसार यंदाच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये लॅब सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
























































