
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात अल्पवयीन मुलीवर झालेल्या निर्घृण ॲसिड हल्ल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, घटना घडूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपासासाठी पाच विशेष पथके नियुक्त केली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केला आहे.
काल दुपारच्या सुमारास सारखी ओढा परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर अचानक ॲसिड फेकले आणि क्षणात घटनास्थळावरून पलायन केले. या भयानक प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिकांची चौकशी सुरू केली आहे. मात्र हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून आरोपींबाबत ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत.
तपास वेगाने सुरू आहे. आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल,” असा विश्वास पोलीस अधीक्षक घार्गे यांनी व्यक्त केला. या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




























































