मुस्लिमांच्या दोन गटात हाणामारी, भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांनाही झोडपले

2373

अहमदपूर शहरात किरकोळ कारणावरून मुस्लिमांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात नऊ जण जखमी झाले असून त्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही जमावाने मारहाण केली. याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.

जिल्हा परिषदेच्या मैदानावर बुधवारी किरकोळ कारणावरून वादावादी झाली. या भांडणाचा राग मनात धरत शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका गटातील काही व्यक्तींनी दुसऱ्या गटाच्या व्यक्तीच्या घरात घुसून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत मतीन सिद्दीकी सय्यद, समीर साबेर सय्यद ,मेहबूब मन्नान मणीयार, खय्युम मन्नान मणीयार, जाबेर अहमद पठाण, जिलानी मन्नान मणीयार जखमी झाले.  त्यापैकी जावेद पठाण व जिलानी मणियार यांच्यावर किरकोळ उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर उर्वरित चार जणांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले आहे.

मारहाण सोडवण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागोराव जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुहास बेंबडे, पोलीस कॉन्स्टेबल सुग्रीव देवळे यांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राखीव पोलीस दलाच्या दोन गटासह किनगाव, जळकोट, वाढवणा येथील पोलीस दलाच्या अतिरिक्त तुकड्या बोलावण्यात आल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. या घटनेतील आरोपींची गय केली जाणार नाही. यातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करणार असून यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लातूरचे अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या