संभाजीनगर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल – मंत्री सुभाष देसाई

संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून लवकरच संभाजीनगर जिल्हा कोरोनामुक्त होऊन शुन्य मृत्यूदर होईल. पर्यटन, कृषी, उद्योग, पाणीपुरवठा आदी विभागांच्या कालबद्ध योजनेतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले, यावेळी देसाई बोलत होते. कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, इतर मान्यवर, अधिकारी यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री यांनी देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटालाही आपण खंबीरपणे सामोरे जात आहोत.  गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना विरोधातील लढाईत संसर्गाला रोखण्याच्या दिशेने लसीकरणाची सुरुवात हे एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल आहे.

आपल्या कोरोना योध्दयांना पहिल्या टप्प्यातील लसीकरण करणे सुरू झाले. पण आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा असल्याने सर्वांना लस मिळेपर्यंत कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  वाढत असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होऊन आपल्या सर्वांचे प्रयत्न यशस्वी होतील, याची खात्री आहे. तसेच जिल्ह्यातील मृत्यूदर कमीत कमी होत असून ही खरोखरच दिलासादायक बाब आहे, जिल्ह्याचा मृत्यूदर शून्य व्हावा, ही प्रार्थना आहे.

जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत संभाजीनगर शहरात रस्ते अपघातांची संख्या व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी करण्यात यश मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांचा झालेला गौरव अभिमानास्पद आहे.

कोविडच्या काळात ‘लोकशाही न्यूज’ या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या CPL म्हणजेच ‘कोरोना प्रीमिअर लिग’ या स्पर्धेत शासकीय यंत्रणेने केलेले प्रयत्न, लोकसहभाग, मृत्यूदर कमी करण्यात यश आल्याने आपल्या संभाजीनगरला प्रथम क्रमांक मिळाला आहे. यानिमित्त देखील आपल्या जिल्ह्याचा शासनामार्फत गौरव होणार आहे. त्याबद्दल मनपा आणि जिल्हा प्रशासनाचा गौरव करतो.

कोरोना संकटाने जगाचा इतिहासच बदलवून टाकला. महाराष्ट्राने या कठीण काळात प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी वर्गाला, सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत शेती, रोजगार यासह इतर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्याला प्राधान्य दिले.

संभाजीनगर जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान (PMKISAN) योजने अंतर्गत एकुण 3 लाख 93 हजार  शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. संभाजीनगर जिल्हयात रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात गती घेत असून 9 तालुक्यांमध्ये 1307 शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे.  आता आपण कोष निर्मितीसाठीचे केंद्र करत आहोत.

शिवभोजन ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून सर्व तालुक्यामध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.  या योजनेला सुरूवात होऊन आज एक वर्ष पूर्ण होत असून आजपर्यंत 7 लाख 1 हजार 978 लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, याचा आनंद आहे.

आरोग्‍य सुविधांच्या बळकटीकरणासोबतच जिल्ह्याचे अर्थचक्र ज्यावर आधारित आहे, असे उद्योग क्षेत्र सुरळीत ठेवण्यासाठी पहिल्या टप्‌प्याटप्याने परवानगी देण्यात आल्या. आता उद्योगचक्र फिरू लागले आहे, यात औषधी उत्पादन, खाद्यपुरवठा, खाद्य प्रक्रिया व इतर पूरक उद्योगांचा समावेश आहे.

ऑरिक सिटी शेंद्रा येथे एका रशियन कंपनीस स्टिल उत्पादनासाठी 44 एकर जागेचे वाटप करण्यात आले आहे.  या कंपनीत 1 हजार कोटींची गुंतवणूक होऊन स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. DMIC शेंद्रा येथे सन 2020 मध्ये 62 एकरचे 20 भूखंड वाटप करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या तीनही सामंजस्य करारामध्ये जिल्ह्यातील नवीन येणाऱ्या उद्योगांचा समावेश आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक प्रकारचे कमांड अँड कंट्रोल केंद्र पोलिस आयुक्तालयात कार्यान्वित केले आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होईल व नागरिकांना दिलासा मिळेल.

जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक सातत्याने वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा आघाडीवर नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शिवाय जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांना पुढाकार घेणे आवश्यक आहे. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी जाणीवेने प्रयत्न करत आहेत. या जिल्ह्याला पर्यटनातील आघाडीवरचा जिल्हा म्हणून लौकिक प्राप्त होईल. तसेच जलजीवन मिशनच्या माध्यमातून 706 कोटी रुपये निधीतून प्रत्येक घराला नळाला पाणी मिळेल, अशा प्रकारच्या कालबद्ध योजनेसही शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा चौफेर प्रगती होऊन येथील नागरिकांना समाधानकारक व आनंदाचे जीवन लाभावे यासाठीचे शासनाचे प्रयत्न यशस्वी होतील, असे सुरूवातीला पालकमंत्री देसाई यांचे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर देसाई यांनी परेडचे निरीक्षण केले.

यावेळी देसाई यांच्याहस्ते विविध पुरस्कार, बक्षीसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर देसाई यांनी सर्व निमंत्रितांची भेट घेऊन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या