
लॉटरी लागल्याचे सांगून एका डॉक्टरला 47 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून ते जुलै 2024 यादरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. विजय नामदेव गाडे यांचे नेवासा येथे गाडे नेत्रालय आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर ट्रेडिंग कसे करावे, नफा कसा मिळवावा, याबाबतची जाहिरात पाहिली. त्यावर डॉक्टरांनी क्लिक केले असता त्यांना एक लिंक आली. त्यावर क्लिक केले असता ते ‘आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए-5’ या ग्रुपला जॉईन झाले. या ग्रुपची ऍडमिन अनिका शर्मा हिने डॉक्टरांशी संपर्क करून आम्ही सांगतो तशी गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असे सांगितले. त्यानुसार डॉक्टरांनी बँक खात्यातून 19 जून ते 9 जुलै 2024 या दरम्यान 39 लाख 3 हजार रुपये ट्रान्स्फर केले. मात्र, परतावा मिळत नव्हता.
त्यामुळे त्यांनी अनिका शर्मा हिच्याकडे विचारणा केली. तेव्हा तिने आयपीओमध्ये लॉटरी लागल्याचे सांगत आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले. यावेळी डॉक्टरांनी 11 जुलै रोजी पुन्हा 8 लाख रुपये ट्रान्स्फर केले. त्यानंतरही परतावा न मिळाल्याने त्यांनी चौकशी केली असता, आणखी चार लाख भरण्यास सांगण्यात आले. डॉक्टर गाडे यांना संशय आल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.