
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2026 ते 2031 या कालावधीसाठी होणाऱया संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेली ही प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी कदम यांनी दिली. प्रारूप मतदारयादीवर आक्षेप असल्यास 21 ऑगस्टपर्यंत संबंधित व्यक्ती अथवा सभासद संस्थांना लेखी स्वरूपात दाखल करता येईल.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बँकेच्या विविध सभासद संस्थांच्या प्रतिनिधींमधून पात्र मतदारांची प्रारूप यादी तयार करण्यात आली असून, ती संबंधित कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारूप मतदारयादी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अहिल्यानगरच्या मुख्य कार्यालयात तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय अहिल्यानगर जिह्यातील संबंधित तालुका कार्यालयांमध्येही ही यादी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग यांच्या कार्यालयासह राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या संबंधित माध्यमातूनही मतदार यादी उपलब्ध होणार आहे.
या प्रारूप मतदार यादीमध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, कृषी पणन संस्था, तसेच बिगरशेती सहकारी संस्थांशी संबंधित मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित सभासद संस्था व पात्र मतदारांनी आपले नाव, संस्थेची नोंद, मतदार म्हणून असलेली पात्रता, तसेच यादीतील अन्य तपशील तपासून घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होताच, जिह्यातील सहकार क्षेत्रातील इच्छुक उमेदवार, सभासद संस्था आणि विविध राजकीय गटांचे लक्ष आता या यादीकडे लागले आहे. कोणत्या संस्थांना मतदार म्हणून स्थान मिळाले आहे, कोणाची नावे आहेत तसेच कोणत्या नावांवर आक्षेप घेतले जातात, यावरून आगामी काळात सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांनाही वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यांना वेग येणार आहे.
मतदारात संगमनेर आघाडीवर
मतदारांची तालुकानिहाय आकडेवारी पाहता संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 732 मतदार आहेत. त्यापाठोपाठ अकोले 533, अहिल्यानगर तालुका 395, श्रीगोंदा तालुक्यात 332, राहुरीत 266, नेवासा 255, श्रीरामपूर 248, पारनेर 231, कर्जत 208, राहाता 286, कोपरगाव 151, पाथर्डी 133, शेवगाव 123 आणि जामखेडमध्ये 119 मतदारांच्या नोंदी आहेत.
21 ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येणार
प्रारूप मतदार यादीवर आक्षेप किंवा हरकत असल्यास 19 ते 21 ऑगस्ट या कालावधीत संबंधित व्यक्ती अथवा सभासद संस्थांना लेखी स्वरूपात दाखल करता येणार आहेत. हरकत दाखल करताना त्यासंदर्भातील कागदपत्रे व पुरावे सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त हरकती व आक्षेपांची छाननी करून त्यावर सुनावणी व आवश्यक ती कार्यवाही करून निर्णय घेण्यात येईल. या प्रक्रियेनंतर मतदार यादीत आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येणार असून, 10 सप्टेंबर 2026 पर्यंत आक्षेपांवरील निर्णयाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर अंतिम मतदार यादी 15 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी कदम यांनी दिली.




























































