नगर बाह्यवळण रस्त्यावर होणार पाच उड्डाणपूल, जुलै महिन्यात होणार वाहतुकीसाठी खुले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात सध्या रस्त्यांची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू झाली आहेत. हे रस्ते लवकरात लवकर विकसित व्हावेत, या दृष्टिकोनातून प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगरमधील एक हजार कोटी रुपयांच्या ‘बाह्यवळण’ रस्त्यावर पाच उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, जुलै महिन्यापर्यंत कामे पूर्णत्वाला जाऊन वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

तब्बल 1 हजार कोटी रुपये खर्च करून तयार होत असलेल्या नगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्याचे 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. या बाह्यवळण रस्त्यावर पाच उड्डाणपूल असणार आहेत. या उड्डाणपुलाचे कामदेखील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. जुलै 2023 नंतर हा बाह्यवळण रस्ता व पाच उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. 40 किलोमीटर अंतराचा बाह्यवळण रस्ता पुणे, दौंड, सोलापूर, जामखेड, कल्याणहून येणाऱया प्रवाशांचा वेळ वाचेल. त्याचबरोबर नगर शहरातून जाणारी 70 टक्के वाहतूकही कमी होणार आहे.

नगर जिह्यातील प्रसिद्ध शिर्डी व शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी उत्तर व दक्षिण हिंदुस्थानातील भाविक मोठय़ा संख्येने नगर शहरामार्गे जातात व येतात. प्रामुख्याने उत्तर हिंदुस्थानातील पंजाब, हरियाणा, कश्मीर, राजस्थान व दक्षिण हिंदुस्थानातील आंध्र प्रदेश, हैदराबाद या राज्यांतून रस्तेमार्गे येणाऱया भाविकांना शिर्डीकडे नगर शहरातून जावे लागते.

सध्या काम सुरू असलेल्या बाह्यवळण रस्त्यावरून काही प्रमाणात वाहतूक सुरू आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. शिवाय शिर्डी व संभाजीनगरहून येणारी अवजड वाहतूक शेंडी, विळद घाट येथून याच बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात आली आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा, यासाठी बाह्यवळण रस्त्यावर तब्बल पाच उड्डाणपूल असणार आहेत. प्रामुख्याने बाह्यवळण रस्त्यावरून क्रॉस होणाऱया पुणे-संभाजीनगर, कल्याण-नगर, दौंड-नगर, सोलापूर-नगर, जामखेड-नगर रस्त्यावर हे पाच उड्डाणपूल असणार आहेत. या उड्डाणपुलाचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.

अरणगावला दोन उड्डाणपूल

z बाह्यवळण रस्त्यावर नगर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या अरणगाव येथे दोन उड्डाणपूल असणार आहेत. नगरहून फलटण, बारामतीकडे जाणाऱया महामार्गावरून नगर-आष्टी रेल्वे मार्ग गेल्यामुळे तेथे रेल्वेचा उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. तर अरणगाव सोडल्यानंतरच्या पहिल्या चौकात राष्ट्रीय महामार्गाचा एक उड्डाणपूल असणार आहे.

दहा किमीचा नवा ग्रीनफिल्ड शहापूरजवळ जोडणार

z नगर शहराबाहेरून जात असलेल्या 40 कि.मी.च्या बाह्यवळण रस्त्यालगतच एक नवा 10 कि.मी.चा ग्रीन फिल्ड महामार्ग तयार होत आहे. त्याचे कामही 70 टक्के झाले असून, हा ग्रीनफिल्ड वाळूंज फाटा ते शहापूरपर्यंत (चाँदबिबी महल) आहे. पाथर्डी रस्त्याला हा ग्रीनफिल्ड जोडण्यात येणार आहे.

बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या पाच उड्डाणपुलावर स्लॅब व गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलामुळे क्रॉसिंगच्या चौकातून थेट जाता येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे. या उड्डाणपुलाचे व बाह्यवळण रस्त्याचे काम जुलै अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. – दिग्विजय पाटणकर, अभियंता, बाह्यवळण रस्ता.