राहाता शहरातील 20 वर्षांपासूनचे अतिक्रमण पालिकेकडून जमीनदोस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात चितळी रोडलगत गेल्या 20 वर्षांपासून अनेक नागरिकांनी नगरपरिषदेच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते. शहरातील अनेक नागरिकांनी याबाबत नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत नगरपरिषदेच्या नव्याने हजर झालेले मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवली आहे.

मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण हे भल्या पहाटे जेसीबी, ट्रक्टर आणि पालिका कर्मचाऱयांच्या फौजफाटय़ासह अतिक्रमणस्थळी दाखल झाले. अतिक्रमण केलेल्या रहिवासी आणि व्यावसायिकांना या कारवाईबद्दल पूर्वकल्पना नसल्याने त्यांची चांगलीच धावपळ उडाली. साधारण 15 ते 20 वर्षांपासूनचे आपले दुकान तोडले जात असल्याने व्यावसायिकांचा संताप झाला होता. मात्र, पालिकेच्या कारवाईपुढे त्यांचा नाईलाज झाला. अतिक्रमण काढण्यास आमची हरकत नसून, आम्हाला पूर्वकल्पना द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अतिक्रमणधारकांची होती.

मुख्याधिकारी चव्हाण हे एक महिन्यापूर्वी राहाता पालिकेत रुजू झालेत. त्यामुळे शहरात अद्यापि त्यांचा चेहरा अनेकांना परिचित नाही. त्यातल्या त्यात अतिक्रमण कारवाईसाठी ते ओळखपत्र न लावताच नाईट ड्रेसवर उपस्थित राहिल्याने काही नागरिकांनी त्यांना ओळखले नसल्याने वादविवाद झाले. काही काळ मुख्याधिकारी आणि अतिक्रमणधारकांमध्ये बाचाबाची झाली. ते मुख्याधिकारी असल्याचे समजताच संबंधितांनी शांत राहणेच पसंत केले.

नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण करीत अनेक नागरिक अवैध व्यवसाय करीत असल्यामुळे शहरात सतत शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे नगरपरिपदेच्या वतीने अशा प्रकारची अनधिकृत अतिक्रमणे तत्काळ काढून घेतली जातील; तसेच नागरिकांनी यापुढे शासकीय किंवा नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण करू नये, अन्यथा अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करून अतिक्रमण काढले जाईल; तसेच यात कोणाचीही गय केली जाणार नाही. – चंद्रकांत चव्हाण, मुख्याधिकारी, राहाता नगरपालिका.