नगर- विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

450

श्रीरामपूर शहरातील थत्ते मैदान परिसरात राहणारी वंदना दिपक सिरपुरे (वय 31) या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरात राहणारे नागरिक वेगळी चर्चा करत असल्याने आत्महत्येविषयी गूढ वाढले आहे.

मयत वंदना हिचे पती दिपक सिरपुरे हे श्रीरामपूर पंचायत समितीच्या लेखा विभागात सेवेत आहे. मयत वंदना ही त्यांची दुसरी पत्नी आहे. त्यांना एक मुलगी आहे. पहिल्या पत्नीला एक मुलगी असून ती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास वंदना घरात एकटी होती. त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महात्या केली. ही घटना घडली तेंव्हा पती दिपक हे पंचायत समिती मध्ये काम करीत होते. तिथे फोन आल्यावर ते तात्काळ घरी गेले. पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

शनिवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली. आत्महत्या करण्यापूर्वी वंदना यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती किंवा काय या विषयी पोलीस बोलत नाही. तक्रार नसल्याने कुणावरही गुन्हा दाखल केला नाही. असे असले तरी दिपक व त्यांच्या घरातील महिला पुरुषांना पोलीस ठाण्यात कशाला बोलविले. तक्रार नाही तर स्मशान भूमीत बंदोबस्त का लावला. पती दिपक हे पंचायत समितीमध्ये अधिकारी आहेत म्हणून पोलिस कारवाई करत नाही. इतर गुन्ह्यात पोलीस स्वत:हून पुढाकार घेवून गुन्हे दाखल करतात या घटनेत तशी तत्परता का दाखविली नाही. एकदंर आत्महत्या प्रकरण संशयास्पद असल्याची चर्चा थत्ते मैदान परिसरात ऐकावयास मिळाली.

वंदना हिने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दिपक हा तिचा दुसरा पती आहे. घरात चिठ्ठी सापडली नाही. अनुचित प्रकार घडू नये म्हणून अंत्यविधीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. दोघांच्या वयामध्ये बरेच अंतर असल्यामुळे लोक चर्चा करतात. मात्र कोणी तक्रार दिली तर गुन्हा दाखल करण्यात येईल.
– राहुल मदने, पोलीस उप अधिक्षक, श्रीरामपूर

आपली प्रतिक्रिया द्या