नगर महापालिकेच्या अंदाजपत्रकात 42 कोटींची घट, 716 कोटींचे बजेट महासभेस सादर; आज होणार चर्चा

मनपा प्रशासनाने 2020-21 या आर्थिक वर्षाचे 715 कोटी 71 लाखांचे अंदाजपत्रक साडेतीन कोटींच्या शिलकेसह आज महासभेस सादर केले. मागील वर्षी प्रशासनाकडून 757 कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात सरासरी 42 कोटींची घट झाल्याचे दिसून येत आहे. अंदाजपत्रकावरील अभ्यासासाठी ही महासभा स्थगित करण्यात आली असून, उद्या दुपारी 1 वाजता पुन्हा महासभा होऊन त्यात अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे अध्यक्षतेखाली आज ऑनलाइन पद्धतीने अंदाजपत्रकीय महासभा झाली. यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी 715 कोटी 71 लाखांचे अंदाजपत्रक महापौर वाकळे यांच्याकडे सादर केले. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्त प्रदीप पठारे, मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रवीण मनकर, नगरसचिव एस. बी. तडवी आदी उपस्थित होते. कोरोनामुळे अंदाजपत्रक रखडले होते. अंदाजपत्रकाअभावी कामे रखडल्याचा आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला होता.

आज सकाळी 11 वाजता अंदाजपत्रकीय सभेस सुरुवात झाली. या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न 294 कोटी 73 लाख, भांडवली जमा 380 कोटी 1 लाख आहे. महसुली उत्पन्नात संकलित करापोटी 34 कोटी, शास्तीपोटी 55 कोटी, संकलित करावर आधारित करापोटी 14 कोटी, जीएसटी अनुदान 95 कोटी 74 लाख व इतर महसुली अनुदान 3 कोटी, गाळा भाडे 3 कोटी, पाणीपट्टी 18 कोटी, मीटरद्वारे पाणीपुरवठा 42 कोटी, संकीर्ण 98 लाख आदी महत्त्वाच्या बाबी आहेत.

महसुली खर्च 241 कोटी 76 लाख असून, भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरून 433 कोटी 27 लाख अंदाजित जमा होणार आहेत. खर्चामध्ये वेतन, भत्ते व मानधनावर 121 कोटी, पेन्शन 31 कोटी, पाणीपुरवठा वीजबिल 34 कोटी, पथदिवे वीजबिल 9 कोटी 50 लाख, शिक्षण मंडळ वर्गणी 3 कोटी 65 लाख, महिला व बालकल्याण योजना 1 कोटी 36 लाख, अपंग पुनर्वसन योजना 1 कोटी 36 लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना 4 कोटी 7 लाख, नगरसेवक मानधन 1 कोटी 80 लाख, औषधे व उपकरणे 60 लाख, नगरसेवक स्वेच्छा निधी 5 कोटी 96 लाख, कचरासंकलन व वाहतूक 1 कोटी, पाणीपुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 70 लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी 1 कोटी 65 लाख, अशुद्ध पाणी आकार 1 कोटी 75 लाख यांसह शासनाकडून प्राप्त विविध कामांसाठीच्या निधीची मनपा हिश्श्याची रक्कम भरणे प्रस्तावित आहे. शासन अनुदानातून अमृत योजना, सर्वांसाठी घरे, नगरोत्थान योजना, मूलभूत सोयी-सुविधा आदी योजना राबविण्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे.

पहिल्याच महासभेला स्थायी सभापतींची दांडी
अंदाजपत्रकीय महासभेस स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर गैरहजर होते. सभापती झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच महासभा आहे. सभापती मनोज कोतकर हे महासभा संपल्यावर उशिरा मनपात आले. यावेळी पदाधिकारी व अधिकारी महापौरांच्या दालनात बसले होते. सभेची माहिती आपल्याला का दिली नाही, अशी तक्रार कोतकर यांनी अधिकाऱयांकडे केली. मात्र, कोतकर यांच्या स्वीय सहायकांना दोनवेळा फोन करून माहिती दिल्याचे यावेळी अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.

नगरसेवक निधीसाठी 6 कोटी
या अंदाजपत्रकात नगरसेवक स्वेच्छा निधीसाठी 5 कोटी 96 लाखांची तरतूद करण्यात आली आहे, तसेच पाणीपुरवठा व पथदिवे बिलासाठी अनुक्रमे 34 कोटी व 9 कोटी 50 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या