नगरमधील पठारे, भोसले टोळीविरूद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र

नगर जिल्ह्यात संघटित गुन्हे करणाऱया भोसले व पठारे टोळय़ांमधील सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापूर्वी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तपास करीत यातील आरोपींविरुद्ध पुरावा जमा केल्यानंतर मोक्का विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

नगर शहरातील सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱया विजय राजू पठारे (वय 40) याच्यासह त्याच्या टोळीतील अजय पठारे (वय 25), बंडू ऊर्फ सूरज साठे (वय 22), अनिकेत कुचेकर (वय 22), प्रशांत ऊर्फ मयूर चावरे, अक्षय शिरसाठ (वय 23) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण सराईत गुन्हेगार असून, टोळी करून दहशत निर्माण करीत होते.

या टोळीविरुद्ध तोफखाना पोलिसांत तब्बल 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रांचा वापर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आदी प्रकारचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.

भोसले टोळीतील कुख्यात गुन्हेगार राहुल निवाशा भोसले (वय 22, जुना सारोळा कासार) याच्यासह त्याच्या टोळीतील उरुस ज्ञानदेव चव्हाण (वय 33, बुरुडगाव), दगू भोसले (वय 27, पढेगाव, ता. कोपरगाव), निवाशा चंदर ऊर्फ सीताराम भोसले (सारोळा कासार), पप्या मोतीलाल काळे (पैठण) यांचा समावेश आहे. या टोळीविरुद्ध नगर तालुका पोलिसांत 6, कोपरगाव शहर व तालुका पोलिसांत 5, संगमनेर तालुका पोलिसांत 1 दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

अशाप्रकारे जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱया टोळीविरुद्ध आगामी काळात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत.