
पावसाळ्यात शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय बनले असताना, सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात खड्डय़ांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यावर करण्यात आलेली पॅचिंगदेखील काही दिवसांत वाहून गेल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या नावाने सर्वच नागरिक बोटे मोडत असताना सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांनी थेट महापालिका प्रशासनाविरोधात जिल्हा न्यायालयात खासगी दावा दाखल केला आहे. न्यायालयाने हा दावा दाखल करून घेत याची सुनावणी गुरुवारी (दि. 7) ठेवली आहे.
शहरातील खड्डय़ांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक खराब रस्त्यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करून निषेध नोंदवत आहे. समाजातील अपप्रवृत्ती व होणाऱया अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार असल्याने रस्त्यांवरील खड्डेप्रश्नी न्यायालयात दाद मागितली असल्याचे भांबरकर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका कररूपाने जनतेकडून पैसे गोळा करते. त्या मोबदल्यात नागरिकांना नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. कचरा उचलणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे, रस्ते व्यवस्थित ठेवून त्याची निगा राखणे व इतर मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याचे काम होताना दिसत नाही. शहरातील अनेक रस्तेच खड्डे व धुळीने माखले आहेत. याला पूर्णतः जबाबदार महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी आहेत. ठेकेदाराच्या कामाची गुणवत्ता तपासणे व काम योग्य झाले असल्यास त्या ठेकेदाराचे बिल काढण्याचे काम महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांनी केले पाहिजे. मात्र, महापालिकेत अशा सर्व कामांबाबत अनागोंदी असल्याचा आरोप भांबरकर यांनी केला आहे.
शहरातील रस्ते निकृष्ट व खड्डेमय होण्यास जबाबदार असणाऱया महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, शहरातील खड्डेमय रस्ते चांगल्या दर्जाचे, मजबूत, खड्डेमुक्त धूळमुक्त करण्यात येण्याच्या मागणीसाठी भांबरकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या संदर्भात भांबरकर यांच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ऍड. शिवाजी सांगळे काम पाहात आहेत.




























































