नगर शहराचा पाणीपुरवठा आज व उद्या विस्कळीत राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीकामांसाठी मंगळवारी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या कालावधीत शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहर व उपनगरांचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार आहे, असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मंगळवारी (दि. 21) अमृत पाणीपुरवठा योजनेच्या व शहर पाणी योजनेवरील दुरुस्तीकामांसाठी शटडाऊन घेण्यात येणार असल्याने मुळानगर पंपिंग स्टेशन येथून शहरासाठीचा पाणीउपसा बंद राहणार आहे. परिणामी, शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता येणार नाहीत. त्यामुळे मंगळवारी सकाळी 11 नंतर पाणीवाटपाच्या बोल्हेगाव, नागापूर, पाइपलाइन रोड, निर्मलनगर, सूर्यनगर, लक्ष्मीनगर,  मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोड परिसर आदी भागांना पाणीपुरवठा होणार नसून, तो 22 रोजी करण्यात येईल. तसेच 22 रोजी रोटेशननुसार शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, तोफखाना, चितळे रोड, आनंदी बाजार, खिस्तगल्ली, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, नवी पेठ, माळीवाडा (काही भाग), बालिकाश्रम रोड, सावेडी, स्टेशन रोड, भागांत पाणीपुरवठा होणार नसून, तो 23 रोजी होईल.

त्याचप्रमाणे गुरुवारी (दि. 23) रोटेशननुसार पाणीवाटपाच्या शहराच्या मंगलगेट, रामचंद्र खुंट, कोठला, झेंडीगेट, कचेरी परिसर, दाळमंडई, धरतीचौक, माळीवाडा, बंगाल चौकी या भागांसह गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल, प्रेमदान, टीव्ही सेंटर हडको, सारसनगर व बुरुडगाव रोड या भागांचा पाणीपुरवठा गुरुवारऐवजी शुक्रवारी (दि. 24) करण्यात येईल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.