गरज पडली तर पुन्हा एअर स्ट्राइक करू – हवाईदल प्रमुख गरजले

667

एअर मार्शल आर.के. एस. भदौरिया यांनी सोमवारी हिंदुस्थानी हवाई दलाच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पाकिस्तान आणि चीनला कठोर शब्दांत इशाराही दिला आहे. हिंदुस्थानी हवाई दलाकडे आता राफेल असल्याने आपली ताकद वाढली असून आपण दोन्ही देशांवर मात करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गरज पडली तर हवाई दल पुन्हा एअरस्ट्राइक करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदुस्थान- पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी हवाई दल सज्ज असल्याचे ते म्हणाले.

हिंदुस्थानी हवाई दलात पुढच्या आठवड्यात राफेल दाखल होणार आहे. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी पथकाचे ते प्रमुख होते. त्यांना 26 प्रकारची लढाऊ विमानांचे उड्डाण आणि संचलनाचा अनुभव आहे. हवाई दलात राफेल दाखल होत असल्याने आपले हवाई दल अधिक सक्षम झाले आहे. राफेल आता कोणत्याही युद्धात गेमचेंजर ठरू शकतात, असेही भदौरिया म्हणाले. सध्या देशासमोर अनेक आव्हाने आहेत, त्याचा सामना करण्यास हवाई दल सज्ज असल्याचे ते म्हणाले. सीमाभागात पाकिस्तानच्या सुरू असलेल्या हालचालींवर आमची नजर आहे. गरज पडली तर बालाकोटसारखा एअर स्ट्राइक करण्यासाठी हवाई दल सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानकडून अण्वस्त्र हल्ल्यांच्या दर्पोक्तीबाबत ते म्हणाले, ते त्यांच्या भ्रमात आहेत. त्यांना जे करायचे आहे ते करू द्या, आम्ही कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास सज्ज असल्याचे ते म्हणाले.

देशासमोरील सर्व आव्हानांकडे आणि संभाव्य धोक्यांकडे हवाई दलाचे लक्ष आहे. सर्व परिस्थिती हाताळण्यास हवाई दल आणि सैन्य दल सज्ज आहे. सध्या हिंदुस्थान आणि पाकिस्तानात तणाव वाढल्याने पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्यांची शक्यता आहे. आपले जवान सतर्क असल्याने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या