Ahmedabad Plane Crash – दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे नव्हे तर जाणीवपूर्वक केलेल्या एका कृत्यामुळे घडली! इटलीच्या वृत्तपत्राचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबाद विमानतळावर जून 2025 मध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. या अपघाताबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे नसून जाणीवपूर्वक केलेल्या एका कृत्यामुळे घडल्याचा दावा इटालियन वृत्तपत्र ‘कोरीएर डेला सेरा’ने केला आहे. एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच कोसळले होते. या दुर्घटनेत 260 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतांमध्ये विमानातील प्रवाशांसह ज्या हॉस्टेलवर विमान कोसळले, तेथील वैद्यकीय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या भीषण दुर्घटनेतून केवळ एक प्रवासी सुदैवाने वाचला होता.

सुरुवातीला हा अपघात इंजिनमधील बिघाडामुळे झाल्याचे मानले जात होते. मात्र, इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यानुसार अमेरिकन तज्ज्ञांनी या तपासात मोठे यश मिळवले आहे. वृत्तात असे म्हटले आहे की, तपासकर्त्यांना आता संशय आहे की, वैमानिकाने विमानाचे इंधन नियंत्रण स्विच जाणीवपूर्वक बंद केले होते, ज्यामुळे विमान अचानक जमिनीवर कोसळले. जुलै 2025 मध्ये हिंदुस्थानच्या विमान अपघात तपास ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालातही कॉकपिटमधील एका संभाषणाचा उल्लेख होता. त्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एक वैमानिक दुसऱ्याला विचारत होता की, “तुम्ही इंधन का बंद केले?” ज्यावर दुसऱ्याने “मी नाही केले” असे उत्तर दिले होते.

या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित सभरवाल यांचे नाव समोर येत आहे. अहवालानुसार, अपघाताच्या घटनेनंतर सभरवाल हे नैराश्याने ग्रस्त असल्याचे आढळून आले होते. मात्र, या दुर्घटनेची नेमकी जबाबदारी अद्याप निश्चित झालेली नाही. दुसरीकडे, कॅप्टन सभरवाल यांच्या वडिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या मुलाच्या मानसिक आरोग्याबाबत केले जाणारे दावे आणि घटस्फोटासारख्या वैयक्तिक समस्यांमुळे तो नैराश्यात असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणाची पुन्हा नवीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा (DGCA) अधिकृत अहवाल अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे या निष्कर्षांवर अधिकृत शिक्कामोर्तब होईपर्यंत वाट पाहावी लागेल.