एअर इंडियासाठी नोव्हेंबरमध्ये बोली, या आधी दोन लिलाव फसले

दिवाळखोरीत निघालेली सरकारी हवाई कंपनी एअर इंडियाची संपूर्ण हिस्सेदारी विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा बोली लावली जाणार आहे. एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक असल्याचा दावा सरकारला केला आहे. या आधीच्या दोन लिलाव प्रक्रियेत खरेदीसाठी एकाही कंपनीने भाग घेतला नव्हता.

नागरी हवाई खात्याचे सचिव प्रदीपसिंह खरोला यांची 22 ऑक्टोबरला एअर इंडियाच्या संचालक मंडळाबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत लिलाव प्रक्रियेबाबत शेवटचा हात फिरवला जाणार आहे. विक्रीची लिलाव प्रक्रिया पारदर्शक अशा ई-लिलाव पद्धतीने केली जाणार आहे. एअर इंडिया दिवाळखोरीत गेल्यामुळे कंपनीचा दरदिवशीचा खर्च कोटय़वधीच्या घरात जात आहे.

एअर इंडियाची विक्री का रखडतेय?

  • एअर इंडियावर सध्या 58 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. त्यामुळे एअर इंडियाला खरेदीसाठी कोणी वाली मिळत नाही. खरेदीदाराला हे कर्ज स्वतःच्या डोक्यावर घेऊन कंपनी विकत घ्यावी लागेल. त्यासाठी कोणीही तयार नाही.
  • एअर इंडियाचा तोटा आणि त्यावर वाढत असलेले कर्ज हे सरकारने माफ करावे आणि नंतर तिच्या विक्रीचा व्यवहार करावा असे हवाई क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी खरेदीची प्रक्रिया रखडते.
  • कंपनी विकल्यानंतर त्यातील हजारो कर्मचाऱयांचे सरकार काय करणार किंवा एअर इंडिया खरेदी करणारी कंपनी या कर्मचाऱयांना त्यांच्या कंपनीत सामावून घेईल का याबाबत सरकारकडे कोणतेही उत्तर नाही.
  • एअर इंडियाच्या सर्व कामगार संघटनांनी कंपनीच्या विक्रीला विरोध केला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या