एअर इंडियाच्या एअर होस्टेसवर मध्य रात्री दीडच्या सुमारास एका व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही एअर होस्टेस हिथ्रो येथील रॅडिसन हॉटेलमध्ये थांबली होती. रात्री दीडच्या सुमारास एक व्यक्ती तिच्या खोलीत शिरली. त्या व्यक्तीने एअर होस्टेसवर कपड्याच्या हँगरने हल्ला केला. यानंतर त्याने तिला बेडवरून खाली ओढले. तिने आरडाओरडा केला. त्यावेळी बाजूच्या खोलीतील कर्मचारी धावत घटनास्थळी आले आणि त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर एअर होस्टेसला रुग्णालयात नेले.
सध्या ही एअर होस्टेस हिंदुस्थानात परतली असून तिथे तिचे समुपदेशन केले जात आहे. हे प्रकरण काही दिवसांपूर्वी घडले होते, त्यावर स्पष्टीकरण देताना रविवारी एअर इंडियाने म्हटले, ‘कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. लंडनमधील घटनेमुळे आम्हाला खूप दुःख झाले. हे हॉटेल आंतरराष्ट्रीय साखळीचा भाग आहे. तिथे असा हल्ला होणे निराशाजनक आहे.’ रिपोर्टनुसार, आरोपी नायजेरियन आहे.