
इस्रायल आणि हमासनंतर आता इस्रायल आणि इराणमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. इराणचे समर्थक असलेल्या हुती बंडखोरांनी आज इस्रायलच्या तेल अवीव येथील बेन गुरीयन या सर्वात व्यस्त विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यामुळे दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे AI139 हे विमान अबुधाबीला वळवण्यात आले. युद्धपातळीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. विमानातील 300 प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले असून तेल अवीवला जाणारी विमान उड्डाणे 6 मेपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.
हुती बंडखोरांनी इस्रायलमधील विमानतळावर हल्ला केल्याचे वृत्त येताच तेल अवीवला जाणाऱ्या विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नसून विमान अबुधाबीमध्ये सुरक्षितपणे उतरले असून लवकरच ते दिल्लीला परतेल, असे एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 3 ते 6 मे 2025 दरम्यान विमानांसाठी तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना एकदा तिकीट बदलण्याचा किंवा पूर्ण परतावा मिळवण्याचा पर्याय एअर इंडियाने खुला ठेवला आहे.