
इस्रायलच्या विमानतळावर रविवारी क्षेपणास्त्र हल्ला झाल्यामुळे एअर इंडियाचे तेल अवीवला जाणारे विमान अबू धाबीकडे वळवण्यात आले. फ्लाइटराडार24 ने ट्रॅक केलेल्या फ्लाइट डेटानुसार, विमान जॉर्डनच्या हवाई हद्दीतून उड्डाण करत असताना वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI-139 बोईंग 787 विमान त्याच्या गंतव्यस्थानाकडे जात असतानाच ही घटना घडली. नियोजित लँडिंगच्या सुमारे एक तास आधी इस्रायलच्या विमानतळावर हल्ला झाला. त्यामुळे विमान अबू धाबीकडे वळवले. विमान दिल्लीला परत आणले जाईल, असे एअर इंडियाने सांगितले. क्रू मेंबर्स आणि प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी प्राथमिकता असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी नमूद केले.
दरम्यान, इस्रायलच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर एअर इंडियासह अनेक विमान कंपन्यांनी रविवारी तेल अवीवला जाणारी आणि येणारी उड्डाणे स्थगित केली.