एअर इंडियासाठी अदानीचीही बोली; लिलावाची मुदत 17 मार्चपर्यंत वाढवली

642

कर्जबाजारी ‘एअर इंडिया’चा लिलाव करण्याच्या हालचाली सरकारदरबारी सुरू झाल्या असून अदानी उद्योग समूहानेही त्यासाठी बोली लावण्याची तयारी दर्शवली आहे. एअर इंडियाच्या लिलावात सहभागी होण्यासाठी सरकारने 6 मार्चपर्यंत मुदत दिली होती. मात्र 17 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

गेल्याच वर्षी अदानी समूहाने विमानतळांचे संचालन आणि देखभालीच्या व्यवसायात पाऊल ठेवले. त्यासाठी अदानी एअरपोर्टस् ही स्वतंत्र कंपनीही स्थापन केली. या कंपनीने विमानतळ प्राधिकरणाच्या अखत्यारीतील त्रिवेंद्रम, गुवाहाटी आणि जयपूरसह सहा विमानतळांच्या व्यवस्थापन कामासाठी बोली लावली होती. आता अहमदाबाद, लखनौ आणि मंगळुरू या तीन विमानतळांवरील व्यवस्थापनाचा ठेका अदानीला मिळाला आहे. 2026 पर्यंत अदानी समूह या विमानतळांसाठी दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. एअर इंडिया विकत घेण्याबाबत आम्ही विचार करत आहोत, पण अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्याचे अदानी समूहाच्या वतीने सांगण्यात येत आहे. एअर इंडियाच्या लिलाव प्रक्रियेत टाटा समूह, हिंदुजा, इंडिगो आणि न्यूयॉर्कमधील इंटरअप्स या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. एअर इंडिया विकत घेणाऱया कंपनीला एकूण कर्जापैकी 23286 कोटी रुपयांच्या कर्जाची इतर देणी आहेत त्यांची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. एअर इंडियावर 58255 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे निर्गुंतवणूक प्रक्रियेत एअर इंडियाचा लिलाव केला जाणार आहे. 2016-17 मध्ये एअर इंडियावर 48447 कोटी रुपयांचे कर्ज होते ते 2017-18 मध्ये 55308 कोटी रुपये आणि 2018-19 मध्ये 58225 कोटी रुपयांवर पोहोचले.

लिलावाची मुदत 17 मार्चपर्यंत वाढणार

एअर इंडियाच्या लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी 6 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण आता अदानी समूह त्यामध्ये रस घेऊ लागल्याने 17 मार्चपर्यंत मुदतवाढ करण्याचा विचार सरकार करत आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी मंत्रिमंडळाची एक समितीही नेमली गेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या समितीचे अध्यक्ष असून समितीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, नागरी उड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांचा समावेश आहे. गौतम अदानी हे अमित शहा यांच्या विश्वासातील असल्याचे सांगितले जाते.

  • गेल्याच वर्षी अदानी समूहाने विमानतळांचे संचालन आणि देखभालीच्या व्यवसायात पाऊल ठेवले. त्यासाठी ‘अदानी एअरपोर्टस्’ ही स्वतंत्र कंपनीही स्थापन केली.
  • एअर इंडिया विकत घेणाऱया कंपनीला 23286 कोटी रुपयांच्या कर्जाची व इतर देणी आहेत त्यांची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या