
कॅनडातील व्हँकुव्हरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी कालचा दिवस प्रचंड मनस्तापाचा ठरला. तांत्रिक आणि नियामक चुकांमुळे एअर इंडियाचे विमान तब्बल 8 तास हवेत राहिल्यानंतर पुन्हा दिल्ली विमानतळावर परतले. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान शुक्रवारी दिल्लीहून व्हँकुव्हरसाठी झेपावले होते. ज्या विमानाचा वापर या प्रवासासाठी करण्यात आला होता, त्या विमानाला कॅनडाच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेली ‘नियामक परवानगी’ (Regulatory Clearance) नव्हती. हे विमान तब्बल चार तासाचा प्रवास करून चीनच्या हद्दीत असताना एअर इंडियाच्या व्यवस्थापनाला आपली चूक लक्षात आली. त्यामुळे या विमानाला दिल्लीला परत पाठवण्यात आले. त्यामुळे जाण्याचे चार आणि परतीचे चार असे आठ तास प्रवासी विमानात होते. तासनतास हवेत राहूनही पुन्हा त्याच ठिकाणी परतल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
एअर इंडियासारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपनीकडून झालेली अशी चूक होणे म्हणजे अत्यंत निष्काळजीपणाचे लक्षण असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. एअर इंडियाने देखील या प्रकरणी प्रवाशांची माफी मागून त्यांच्या राहण्याची व कॅनडाला जाण्याची सोय केली आहे.
























































