पुन्हा हिंदुस्थान-चीन थेट विमानसेवा

2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर हिंदुस्थान आणि चीनमधील थेट विमानसेवा बंद करण्यात आली होती. परंतु, आता ही विमानसेवा पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू होण्याचे संकेत आहेत. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत तणावाचे बनले होते. सुमारे पाच वर्षांनंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारत असल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थान सरकारने एअर इंडिया आणि इंडिगो यांसारख्या विमान कंपन्यांना हिंदुस्थान-चीनदरम्यान त्वरित उड्डाणे सुरू करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांदरम्यान दर महिन्याला 539 थेट उड्डाणे सुरू होती.

चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा सुरू

काही महिन्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्दय़ांवर द्विपक्षीय कराराच्या दृष्टीने चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थान आणि चीनवर एकतर्फी कर लादण्याप्रकरणी दोन्ही देशांनी एकमताने विरोध केला. त्यानंतर हिंदुस्थान सरकारने 24 जुलैपासून चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा देण्यास सुरुवात केली.

मोदी 7 वर्षांनंतर चीनला जाणार

शांघाय सहकार्य संघटनेच्या तियानजिन शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता आहे. चीनने त्यांच्या स्वागताची तयारीही सुरू केली आहे. पंतप्रधान चीनला जाण्यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी जपानलाही भेट देऊ शकतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही एससीओ बैठकांसाठी काही दिवसांपूर्वी चीनचा दौरा कला होता.