
एलन मस्क मालक असलेल्या ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तांत्रिक बिघाड झाल्याने युजर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. यामुळे युजर्सकडून रोज तक्रारी येत आहेत. याच कारणावरून आर्यलँडमधील विमान कंपनी रायनएअरने देखील तक्रार नोंदवली. त्यांनी एअरलाइनच्या अधिकृत अकाऊंटवरू मस्कवर टीका केली. “कदाचित तुम्हाला elonmusk वाय-फायची आवश्यकता आहे?” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. यामुळे Elon Musk आणि ‘रायन एअर’ (Ryanair) चे CEO मायकल ओ लेअरी यांच्यात सध्या सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे.
कोणत्याही आरोपांवर बेधडकपणे थेट उत्तर देणाऱ्या मस्क यांनी रायन एअरच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली. “रायन एअर विकत घेऊन ज्याचे नाव खरोखर ‘रायन’ आहे अशा व्यक्तीला तिथे प्रमुख म्हणून मी नेमू का?” अशी प्रतिक्रिया मस्क यांनी दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र, हा वाद केवळ सोशल मीडियासाठी नसून यामागे एक प्रमुख कारण आहे.

काही दिवसांपूर्वीच रायन एअरचे मुख्य अधिकारी मायकेल ओ’लेरी यांनी एका रेडिओ मुलाखतीत एलन मस्क यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती. रायन एअरच्या विमानांमध्ये मस्क यांची ‘स्टारलिंक’ इंटरनेट सेवा वापरली जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारला होता. तेव्हा त्यांनी मस्क यांना “मूर्ख” (Idiot) असे संबोधले होते. मस्क श्रीमंत असले तरी त्यांना विमानाचा खर्च आणि तांत्रिक गोष्टींची समज नाही, असे ते म्हणाले. विमानावर सॅटेलाईट अँटेना बसवल्यास प्रत्येक प्रवाशामागे एक डॉलरहून जास्त खर्च येईल आणि रायन एअरचे प्रवासी प्रवासात इंटरनेटसाठी एक युरो खर्च करण्यास तयार नाहीत. जोपर्यंत ही सेवा मोफत मिळत नाही, तोपर्यंत ती विमानांमध्ये बसवणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या विधानानंतर मस्क यांनी संताप व्यक्त करत ओ’लेरी यांना तात्काळ पदावरून काढून टाकण्याची मागणी केली होती.
मायकेल ओ’लेरी यांनी केवळ मस्क यांच्यावरच नव्हे तर ‘X’ प्लॅटफॉर्मवरही निशाणा साधला. एलन मस्क X वर जे काही अपलोड करतो त्यावर आम्ही जास्त लक्ष देत नाही. आपण कोणत्याही प्रकारचे सोशल मीडिया वापरत नसल्याचे सांगितले. या टीकेमुळे मस्क यांनी विमान कंपनीच्या मालकी हक्काबाबत विधाने करण्यास सुरुवात केली आहे. 2017 मध्येही त्यांनी सहजपणे ट्विटरची किंमत विचारली होती. त्यानंतर ती कंपनी 44 अब्ज डॉलर्सला विकत घेतली होती. त्यामुळे आता रायन एअरच्या बाबतीतही ते असेच काही धाडसी पाऊल उचलतील का? अशी शंका उपस्थित होत आहे.

























































