विमानतळावरील दुकानदारांना दिलासा, करमुक्त दुकानांकडून जीएसटी आकारता येणार नाही

303


छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री शॉप (करमुक्त दुकान) मालकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. करमुक्त दुकानांमध्ये विकल्या जाणार्‍या वस्तूंवर राज्य अथवा केंद्र सरकारला जीएसटी आकारता येणार नाही असे स्पष्ट करत न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने सेल्स टॅक्सने दिलेले आदेश फेटाळून लावले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री शॉप (डीएफएस) दुकानांना वस्तू सेवा कर आणि सीमा शुल्क विभागाने कारणे दाखवा आणि फौजदारी खटल्यासंदर्भात नोटीस बजावली होती. याप्रकरणी फ्लेमिंगो ट्रव्हल रिटेल लिमिटेडच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने नुकताच आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. त्यात वस्तू सेवा कर आणि सीमा शुल्क (कस्टम) विभागाच्या अखत्यारित आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री शॉप येत नाहीत. त्यामुळे ही दुकाने हिंदुस्थानात असली तरी त्यावर जीएसटी लागू होणार नाही. तसेच या दुकानांवर सीमा शुल्क अथवा जीएसटी लागू केल्यास त्यांच्या वस्तूच्या किमतीत वाढ होईल आणि त्याचा परिणाम परकीय व्यापारावर होईल असे खंडपीठाने निकालात म्हटले आहे.

तर ‘ड्युटी फ्री शॉप’ची संकल्पनाच नष्ट होईल

दुसरीकडे ड्युटी फ्री शॉपवर जीएसटी लागू केल्यास ‘ड्युटी फ्री शॉप’ची संकल्पनाच नष्ट होईल अशी भीतीही खंडपीठाने व्यक्त केली. तसेच यासंदर्भातील केंद्र सरकारच्या एका अध्यादेशाचा तसेच सर्वोच्च आणि काही उच्च न्यायालयाच्या निकालांचा दाखला देत दुकान मालकांना दिलासा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या