देशभरातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी; BCAS च्या इशाऱ्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

mumbai-airport

हिंदुस्थानमधील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर हिंदुस्थानमधील सर्व विमानतळांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान विमानतळावर दहशतवादी किंवा समाजविघातक घटकांकडून हल्ला होण्याचा धोका आहे. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्यूरोने (BCAS ) याबाबत अधिसूचना जारी करत विमानतळ, हवाई पट्टे, हेलिपॅड, फ्लाइंग स्कूल आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘हिंदुस्थान टाईम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सुरक्षा शाखेने 4 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केल्या आहेत. यात सर्व विमान वाहतूक सुविधांवर देखरेख वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी किंवा समाजविघातक घटकांकडून संभाव्य धोका असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी दक्षता राखण्याची आणि पाळत ठेवण्याची आवश्यकता आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार, विमानतळ टर्मिनल्स, पार्किंग एरिया, पॅरिमीटर झोन आणि इतर संवेदनशील भागात गस्त ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच भागातील सर्व सीसीटीव्ही यंत्रणाही सक्रिय ठेवण्यात याव्यात आणि कोणतीही संसयास्पद हालचाल किंवा वस्तूची तातडीने तपासणी करण्यात येईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक करणाऱ्या विमानतळांसाठी या अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. विमानतळावरील सर्व कर्मचारी, कंत्राटदार आणि प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करावी. ओळखीची पडटाळणी करावी. कुणीही अनाधिकृतपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास त्वरित तक्रार करावी किंवा त्यांना रोखावे. यासाठी स्थानिक पोली, सुरक्षा दल, गुप्तचर विभाग आणि संबंधित एजन्सीच्या संपर्कात रहा. जेणेकरून दहशतवादी किंवा समाजविघातक घटकांच्या माहितीची देवाण घेवाण त्वरित होईल, असेही यात म्हटले आहे.