
देशभरात रविवारी पहाटे अनेक टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये अचानक बिघाड झाल्याने लाखो युजर्संना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलच्या वापरकर्त्यांनी स्लो इंटरनेट, कॉल ड्रॉप तसेच नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या.
नेटवर्कची स्थिती तपासणाऱ्या डाउन डिटेक्टर या वेबसाइटनुसार, ही समस्या पहाटे सुमारे 3 ते 6 या वेळेत सर्वाधिक तीव्र होती. या तीन तासांच्या कालावधीत नेटवर्कशी संबंधित तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली. अनेक भागांत इंटरनेटचा वेग अत्यंत कमी होता, तर काही वापरकर्त्यांना कॉलही करता येत नव्हते.
व्होडाफोन-आयडिया वापरकर्त्यांना सर्वाधिक त्रास
डाउन डिटेक्टरच्या आकडेवारीनुसार, व्होडाफोन-आयडियाच्या वापरकर्त्यांनी सर्वाधिक तक्रारी नोंदवल्या. मागील 24 तासांत आलेल्या तक्रारींनुसार —
50% वापरकर्त्यांना नेटवर्कच मिळाले नाही
37% वापरकर्त्यांना मोबाईल इंटरनेटची समस्या भेडसावली
13% वापरकर्त्यांना पूर्णपणे ब्लॅकआउटचा अनुभव आला
या तक्रारी बेंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, पुणे, पणजी, लखनऊ, कोलकाता, चेन्नई आणि नवी दिल्ली येथून मोठ्या प्रमाणावर नोंदवण्यात आल्या.
जिओ नेटवर्कमध्ये इंटरनेट व फायबर सेवा प्रभावित
जिओ वापरकर्त्यांनीही मोबाईल इंटरनेट आणि जिओफायबर सेवांमध्ये अडचणी असल्याच्या तक्रारी केल्या. डाउन डिटेक्टरनुसार —
57% तक्रारी मोबाईल इंटरनेटशी संबंधित
30% तक्रारी जिओफायबर सेवांबाबत
13% वापरकर्त्यांनी नेटवर्क मिळत नसल्याची तक्रार केली
एअरटेल आणि बीएसएनएललाही फटका
एअरटेल नेटवर्कमध्येही मोठ्या संख्येने वापरकर्त्यांना समस्या भेडसावल्या. एअरटेलसंबंधी तक्रारींमध्ये
53% मोबाईल इंटरनेट
26% नेटवर्क न मिळणे
22% लँडलाइन इंटरनेटशी संबंधित तक्रारी होत्या
तर बीएसएनएल वापरकर्त्यांच्या तक्रारींनुसार
62% वापरकर्त्यांना नेटवर्क मिळाले नाही
30% मोबाईल इंटरनेट समस्या
8% मोबाईल फोनशी संबंधित अडचणी होत्या
सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्क सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाल्या होत्या. मात्र, या आउटेजमागील नेमकी कारणे काय होती, याबाबत कंपन्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी या नेटवर्क डाऊनबाबत नाराजी व्यक्त केली.
याआधीही घडल्या आहेत अशा घटना
देशभरात याआधीही अनेक वेळा विविध टेलिकॉम कंपन्यांची नेटवर्क सेवा एकाच वेळी विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे वापरकर्त्यांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे, आणि त्यावर सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

























































