आजरा हाजगोळीतील बंधारा धोक्यात; प्रशासन ढीम्म, ग्रामस्थ संतप्त

637
ajara-hajgoli-budruk-bund-d

यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांना मोठा फटका बसला. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हाजगोळी बुद्रुकमधील बंधाऱ्याची स्थिती देखील यामुळे खराब झाली. यासंदर्भात ग्रामस्थांनी तक्रार करून देखील प्रशासन ढीम्म आहे. शिवसेनेनं ग्रामस्थांसाठी आंदोलन केलं असून काम लवकर न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील दिला आहे.

आजरा हाजगोळी बुद्रुक येथे 25 वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याची दुरुस्ती झालेली नाही. यंदा अतिवृष्टी झाली आणि त्याचा फटका या बंधाऱ्याला देखील बसला आहे. अतिवृष्टी झाली तेव्हा बंधाऱ्याने धोक्याची पातळी गाठली होती. आज देखील या बंधाऱ्याला संरक्षण कठडा नसल्याने ये-जा करणाऱ्या वाटसरू आणि वाहनांना रात्रीच्यावेळी अपघात होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी पाटबंधारा विभागाकडे तक्रार केली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे.

अतिवृष्टीच्या काळात ग्रामस्थ आणि शिवसेनेने या बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्क केले. तसेच वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता. मात्र पावसाळा संपल्यानंतर देखील काम होत नसल्याने शिवसेनेचे संजय येसादे यांनी यासाठी लाक्षणिक आंदोलन केले. तसेच यानंतर देखील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे हाती न घेतल्यास प्रशासनाविरोधात आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या