
सामना ऑनलाईन । पुणे
भाजप सरकारने दिलेल्या आमिषांना म्हणजे खोटय़ानाटय़ा आश्वासनाला बळी पडू नका. वर्ध्याच्या सभेवरून कळले हवा बदलते आता गाजर पण लाजून म्हणतंय नका मला दाखवू, असे म्हणत असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मोहन जोशी आणि सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नरपतगिरी चौकात संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी अजित पवार बोलत होते.
भाजपकडून आमिष दाखवून राजकारण – पृथ्वीराज चव्हाण
भाजपकडून या निवडणुकीत दहशत व आमिष दाखवून राजकारण केले जात आहे. साम, दाम, दंड, भेद यावर भाजपचे राजकारण सुरू आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप लोकसभेची निवडणूक वैयक्तिक टीकाटिप्पणी करून व्यक्तिकेंद्रित करू पाहत आहेत, परंतु त्यांना उत्तरे देण्याच्या भानगडीत पडू नका तर त्यांना प्रश्न विचारा, असेही चव्हाण म्हणाले.
नात्यांची किंमत एकटे राहणाऱ्याला काय कळणार – सुप्रिया सुळे
नाते जपणे हे फार मोठे काम आहे. एकटे राहणाऱ्याला ते काय कळणार, असा टोला बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. भाजपकडून घराणेशाहीवर टीका केली जाते ही बाब हास्यास्पद आहे. आमची यादी पाहण्यापेक्षा आरोप करणाऱयांनी स्वतःच्या पक्षातील घराणेशाहीची यादी पाहावी. आपकी बार लांबूनच नमस्कार आहे. हे फेकू सरकार आहे, पण देवेंद्र फडणवीस यांचेसुद्धा फसनवीस सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
देशात एकाधिकारशाही चालू आहे
पुण्याचा खासदार विकासकामे करण्यात नापास झाला हे भाजपनेच घेतलेल्या परीक्षेत कळले म्हणूनच त्यांचे तिकीट कापले. त्यांना आता काहीही व्हीजन राहिले नाही असे सांगून अजित पवार म्हणाले, सध्या दोनच माणसे देश चालवित आहेत. त्यामुळे देशात एकाधिकारशाही चालली आहे. कोण कशासाठी सोडून गेलं मला सगळं माहीत आहे. गेलेल्या सगळ्यांची अंडीपिल्ले माहीत आहेत.























































