लोकसभेतल्या झटक्याने कंबरडं मोडलं; चुकलो, माफ करा! अजितदादांना आता शेतकरी आठवले

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी आणि ‘अब की बार चारसौ पार’ने आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांनी लोकसभा निवडणुकीत जो झटका दिला, त्यामुळे पार कंबरडं मोडायची पाळी आली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जनसन्मान यात्रेत दिली. ‘चूक झाली, मान्य करतो, माफ करा! हात जोडून विनंती करतो, पाठीशी उभे राहा!’, अशी विनवणी दादांनी केली. दादांच्या या बॅटिंगने महायुती पुरती बोल्ड झाली.

नाशिकच्या दिंडोरीतून गुरुवारपासून अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरू झाली. शुक्रवारी निफाड येथे अजित पवार बोलत होते. लाडकी बहीण योजना आणली, भावांसाठीही योजना आणलीय. आता माझ्या कांद्याचं काय, असे शेतकरी म्हणतायत, असे सांगून ते म्हणाले, लोकसभेला जो झटका दिलाय, तो लईच लागलाय, पार कंबरडं मोडायची पाळी आली. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् कृषीमंत्री आमचं एकमत झालंय, कांदा निर्यातबंदी करायची नाही. यासाठी ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी मी बोललो. खासदारांनीही हा मुद्दा मांडला आहे. चूक झाली, मान्य करतो, आता माफ करा, अशी विनवणी केली. ‘अबकी बार चारसौ पार’ या नाऱयाने आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांकांना संविधान बदलणार असे वाटले, यामुळे त्यांनीही झटका दिला. तो तुमचा अधिकार असल्याने आम्ही या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. कुठल्याही गोष्टीतून बोध घ्यायचा असतो, काही शिकायचं असतं. कांदा निर्यातबंदी करायची नाही, शेतकऱयांना वीजबिल माफी असे निर्णय म्हणूनच घेतले, असे सांगत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना जाहीर केल्या जात आहेत याचीच कबुली त्यांनी देवून टाकली.

लोकसभेला तुम्ही जो झटका दिलाय, तो लईच लागलाय, पार कंबरडं मोडायची पाळी आली. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् कृषीमंत्री आमचं एकमत झालंय, कांदा निर्यातबंदी करायची नाही.