
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेला अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झालेला नाही असे प्राथमिक चौकशी अहवालातून समोर आले आहे. या अपघाताला मानवी चुकाही कारणीभूत होत्या, असे अहवालात म्हटले आहे.
प्राथमिक चौकशी अहवाल नुकताच सादर करण्यात आला. विमान लँडिंगच्या वेळी वैमानिकाला धावपट्टीच्या अंतराचा आणि स्थितीचा अचूक अंदाज न आल्याने विमानाचा समतोल बिघडल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. प्राथमिक निरीक्षणांनुसार, विमान उतरण्याच्या क्षणी त्याच्या नियंत्रण प्रणालीमध्ये किंवा इंजिनमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला असावा, ज्यामुळे वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. विमान लँड करताना वैमानिकाचा लँडिंगचा अँगलच चुकला, असा महत्त्वाचा निष्कर्ष अहवालात आहे. प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक समस्यांमुळे वैमानिकाला धावपट्टीची योग्य दिशा आणि उंची राखण्यात अडचण आली. यामुळे विमान भरकटले. धावपट्टीचा अंदाज घेण्यात झालेली ही चूक विमानाची गती आणि इंधन स्थिती लक्षात घेता जीवघेणी ठरली, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
अंतिम अहवालाची प्रतीक्षा
हा केवळ प्राथमिक अहवाल असून सखोल चौकशीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर यांमधील डेटाचे सविस्तर विश्लेषण केले जात आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तांत्रिक बिघाड नेमका कोणत्या क्षणी सुरू झाला आणि वैमानिकाचे अखेरच्या क्षणी काय संभाषण झाले, यावरून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या सर्व तांत्रिक पुराव्यांच्या तपासणीनंतरच अपघाताचे अंतिम कारण स्पष्ट करणारा सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे.
त्रिस्तरीय चौकशीतून उलगडणार रहस्य
ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यात येत आहे. विमानाचा वेग, उंची, इंजिनाचे त्यावेळचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, वैमानिकाचे संभाषण आदी माहिती गोळा केली जात आहे. हा चौकशीचा पहिला स्तर आहे. अशी त्रिस्तरीय चौकशी केली जात आहे.
9 तारखेनंतर सांगणार – रोहित पवार
अजित पवार यांच्या विमान अपघाबाबत आमच्याकडे महत्त्वाची माहिती आली असून विमानात नक्की काय घडले, कशा प्रकारे ती दुर्घटना झाली त्याबाबत आपण 9 फेब्रुवारीनंतर सांगणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
अहवाल सरकारधार्जिणा असेल – विजय पांढरे
हा चौकशी अहवाल सरकारधार्जिणा असेल अशी भीती जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी वर्तवलीय. अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला आहे, पण सरकारी यंत्रणा त्यांच्या मर्जीनुसार अहवाल तयार करून घेईल, असे पांढरे म्हणाले.






























































