
पुणे जिह्यातील शिरूर नगरपरिषद प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघालेल्या शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने 4 वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे पुणे–अहिल्यानगर महामार्गावर घडली. यातील जखमी बालिकेची प्रकृती गंभीर आहे. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) ही या अपघातात गंभीर जखमी झाली. तिला रात्री पुण्यातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर नगरपरिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी शिरूर येथे निघाले होते. बोऱ्हाडेमळा येथील हुंदाई शोरूमसमोर शुभ्रा बोऱ्हाडे ही चार वर्षीय बालिका महामार्ग ओलांडत होती. आमदार कटके यांच्या मर्सिडीज कारने तिला धडक दिली. चालकाने ब्रेक दाबला, परंतु गाडीच्या वेगामुळे शुभ्राला समोरासमोर जोराची धडक बसली. यात ती चेंडूसारखी उडून काही फुट अंतरावर डांबरी रस्त्यावर पडली. यात तिला गंभीर मार लागला असून दात पडून जबड्याला जबर जखम झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
आज शिरूर येथे प्रचारातील पदयात्रेला पोहोचण्यासाठी आमदार कटके वाघोली येथून शिरूरकडे भरधाव जात असताना हा अपघात घडला. पुढाऱ्यांची हीच धावपळ शुभ्रा सारख्या सर्वसामान्य बालिकेच्या जीवावर बेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. मात्र पोलिसांकडून या अपघाताबाबत सांगण्यास नकार देण्यात आला.
अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीजनं 4 वर्षीय चिमुकलीला उडवलं pic.twitter.com/jc2VuOblm2
— Saamana Online (@SaamanaOnline) December 1, 2025




























































