
दिल्लीतील महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगवासात गेलेले छगन भुजबळ आज स्वच्छ झाले. भुजबळांवर तो आरोप भारतीय जनता पक्षानेच केला होता आणि त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती. त्याच भाजपच्या कमळछाप वॉशिंग मशीनने कमाल केली आणि भुजबळांचा आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे फडणवीस यांच्यासोबत मांडीला मांडी लावून ते आता बसणार आहेत.
छगन भुजबळ यांनी आज राजभवन येथे आयोजित समारंभात मंत्रीपदाची शपथ घेतली. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर भुजबळ यांना मंत्री बनवण्यात आले नव्हते. त्याबद्दल त्यांनी अनेकदा उघड नाराजी व्यक्त केली होती. ‘जहा नही चैना, वहा नही रहना’ असे ते जाहीररीत्या बोलल्याने ते महायुतीबरोबर अजित पवार गटालाही रामराम करणार अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु आता भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये फडणवीस यांनीच त्यांना शुद्ध केले.
धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार गटाच्या कोटय़ातील ते मंत्रीपद रिकामी होते. त्याचा प्रभार अजित पवार यांच्याकडेच होता. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा हेच खाते भुजबळांना दिले जाण्याची शक्यता आहे. भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने महायुती सरकार आणि फडणवीसांवर जोरदार टीका होत आहे. संपूर्ण भाजप आणि महाराष्ट्राच्या नकली चाणक्याची लेव्हल आज जनतेला समजली, मुलुंडचा नागडा पोपटलाल तर बेवा झाला… ढोंगी आणि बकवास लेकाचे! अशी घणाघाती टीका शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केली.
देवाभाऊ पूर्वी…
छगन भुजबळांसारखा नटसम्राट उभ्या महाराष्ट्राने पाहिला नाही. ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले नाही, तर भ्रष्टाचार केला म्हणून टाकले.
देवाभाऊ आता…
छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत. देशातील ओबीसींचा आवाज आहेत. भुजबळ यांच्यासारखा ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा सरकारला फायदा होईल.