राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये नाराजीनाटय़ समोर आले आहे. नियुक्त केलेल्या सदस्यांमध्ये पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना डावलण्यात आल्याने शहरातील सुमारे 600 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. मानकर यांना न्याय दिला नाही, तर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे काम करणार नसल्याचा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती केली जाणार होती. मात्र, विधानसभेची आचारसंहिता लागण्यास काही काळ बाकी असताना मंगळवारी राज्यपाल नियुक्त बारापैकी सात जागांवर भाजपचे तीन आणि मिंधे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांची विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती केली. दीपक मानकर यांना यामध्ये डावलण्यात आल्याने शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले.
…तर महायुतीचे काम करणार नाही
ज्यांच्या घरात आमदार – खासदार, मंत्री पदे आहेत, त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. यामुळे पक्षाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. कार्यकर्त्याला योग्य न्याय देणारे अजित पवार आहेत, असा विश्वास आम्हा पदाधिकाऱ्यांमध्ये होता. मात्र, या विश्वासाला तडा गेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व शहर, विधानसभा, विविध सेलचे पदाधिकारी सामूहिक राजीनामा देत आहोत. जोपर्यंत अजित पवार हे आम्हाला मानकर यांना संधी देण्याचा ठोस शब्द देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम करणार नाही, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.