
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाले. बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले आणि या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अजित पवार यांचा विमानातील अखेरचा फोटो समोर आला आहे.
अजित पवार हे व्हीएसआर कंपनीच्या चार्टर्ड विमानाने मुंबईतून बारामतीकडे निघाले होते. त्याच्या विमानाने बुधवारी सकाळी 8.10 मिनिटांनी उड्डाण घेतले होते. सकाळी पावणे नऊच्या सुमारास पायलटने बारामती विमानतळावर विमान लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान विमानाने हवेत हेलकावे खाल्ले आणि विमान खाली कोसळले. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातापूर्वी अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांनी विमानात एक फोटो काढला होता.
Ajit Pawar plane crash – घड्याळ आणि कपड्यांमुळे अजितदादांची ओळख पटली, अपघाताचे CCTV फुटेजही आलं समोर
पीओसए विदीप जाधव यांनी सकाळी हा फोटो क्लिक केला होता आणि आपल्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर पाठवला होता. या फोटोमध्ये जाधव यांच्या उजव्या हाताला अजित पवार बसलेले दिसत आहेत. त्यांनी पांढरा पायजमा, कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाचे जॅकेट घातल्याचे दिसत आहे. त्यांच्या डोळ्यावर नेहमीप्रमाणे काळा गॉगलही दिसतोय. हाच त्यांचा अखेरचा फोटो ठरला.



























































