
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातासाठी वैमानिक सुमित कपूर याची चूक कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती आहे. व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांनी सीआयडीसमोर (CID) नोंदवलेल्या जबाबामुळे या तपासाला नवे वळण लागले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीत सिंग यांनी अपघातावेळच्या परिस्थितीचा सविस्तर उलगडा केला आहे.
व्ही.के. सिंग यांची गेल्या काही दिवसांपासून सीआयडीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान सिंग यांनी अपघाताच्या वेळी असलेल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, तांत्रिक बिघाड किंवा हवामानापेक्षा वैमानिक सुमित कपूर याच्याकडून झालेल्या चुकीमुळेच हा अपघात घडला असावा. या प्रकरणात जर माझी किंवा कंपनीची काहीही चूक आढळली, तर मला कठोर शिक्षा करा, असे विधान करत सिंग यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
सध्या CID चे पथक विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि एटीसी (ATC) मधील संभाषणाची अत्यंत बारकाईने पुनर्तपासणी करत आहे. सुरुवातीला या दुर्घटनेमागे केवळ खराब हवामानाचे कारण पुढे येत होते, मात्र आता वैमानिकाने घेतलेले निर्णय, विमानाचे मेंटेनन्स आणि उड्डाणापूर्वीची अधिकृत परवानगी या तांत्रिक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळे तपास यंत्रणा आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी सीआयडी आता वैमानिक सुमित कपूर याचा मागील उड्डाणांचा रेकॉर्ड आणि त्या दिवसाची त्याची शारीरिक व मानसिक स्थिती याची माहिती गोळा करत आहे. व्ही.के. सिंग यांच्या जबाबामुळे आता पायलटकडून नेमकी काय चूक झाली, हे शोधणे तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान आहे.
अजित पवार विमान अपघात प्रकरण, ‘व्हीएसआर’च्या मालकाची पुण्यात सीआयडी चौकशी
























































