विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून विविध मतदारसंघात मतदार जनजागृती मोहीम सुरू आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) जनजागृती आणि प्रात्यक्षिक, जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. ईव्हीएम रथाला झेंडा दाखवून निवडणूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा मागवला आहे.
निवडणूक आयोगाच्या कक्षेतील हा कार्यक्रम इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित न करता मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्याने आचारसंहिता भंगाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग झालाय का? नियम डावलून निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम प्रचार रथाचे अजित पवारांनी उद्घाटन केले का? याचा खुलासा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून मागविला आहे.
निवडणूक आयोगाचे कार्यक्रम कसे घ्यावेत याचे नियम निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाचे कार्यक्रम मंत्री, लोकप्रतिनिधी किंवा ठरावीक राजकीय पक्षाच्या प्रमुख किंवा प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेऊ नयेत असा नियम आहे, मात्र निवडणूक आयोगाचे सर्व नियम धाब्यावर बसवून खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मतदान यंत्र हाताळणी व प्रशिक्षण कार्यक्रम जनजागृती रथाचे उद्घाटन केले.
नियम काय?
निवडणूक आयोगाचे कार्यक्रम हे सरकारचे मंत्री किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रमुख किंवा प्रतिनिधीच्या उपस्थितीत न घेता सर्वपक्षीय प्रतिनिधींना निमंत्रित करून निवडणूक आयोगाच्या अधिनिस्त असणाऱ्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत किंवा हस्ते करण्याचे संकेत आहेत.