इजा, बिजा आणि आता तिजाही झाले! कोकाटेंचा सोमवारी फैसला अजितदादांनी भेटायला बोलावले

रमीपटू कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले. कोकाटेंनी आतापर्यंत वादग्रस्त वक्तव्ये केली. इजा झाले…बिजा झाले… तिसऱयांदा समज देण्याची वेळ आणू नका असे आपण कोकाटेंना सांगितले होते. त्यामुळे येत्या सोमवारी त्यांच्याशी भेट होणार आहे तेव्हाच काय तो फैसला होईल, असे संकेत अजितदादांनी दिले. कोकाटेंचे व्हिडीओ प्रकरण विधिमंडळ सभागृहाच्या आत घडले असल्याने तो विषय विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींच्या अखत्यारित येतो, असेही ते म्हणाले.

सरकारला भिकारी म्हणाल्याचा जाब विचारणार

कृषिमंत्री कोकाटे सरकारला भिकारी म्हणाले होते. त्याबाबतही आपण बैठकीत त्यांच्याशी बोलू, असे अजित पवार यांनी सांगितले. राजकीय जीवनात आणि प्रमुख पदावर काम करत असताना प्रत्येकाने भान ठेवून वागले-बोलले पाहिजे हेच आपले सांगणे आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून एकत्रितपणे निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. कोकाटेंशी प्रत्यक्ष भेट अजून झालेली नाही. ती सोमवारी होईल, असे दादांनी सांगितले.