
गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री आम्ही मांडलेली होती. आणि यांनी पंचामृत आणलं. मुळात अमृत कुणीही पाहिलेलं नाही, फक्त ऐकत आलो आहोत. तसंच हे विकासाचं पंचामृत कधीही दिसणार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
विधानसभेचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना ही टीका केली. ते म्हणाले की, आज आपण सगळ्यांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला तो सगळ्यानी बघितला. खरंतर चुनावी जुमला जसा असतो, तसा हा अर्थसंकल्प आहे. दूरदृष्टीचा अभाव, वास्तवाचं भान नसलेला अर्थसंकल्प. कारण, या राज्यात 9 वर्षं जयंत पाटील यांनी आणि सात वर्षं मी स्वतः अर्थसंकल्प सादर केलाय. परंतु स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे. यातील अतिशयोक्ती नाही. मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून बोलत नाही. परंतु राज्याचं एकंदरीत काय परिस्थिती, राज्याचं उत्पन्न किती, खर्च किती होणार आहे, ज्या प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या. खरंतर आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला, असं ते म्हणाले.
अर्थसंकल्पावर टीका करताना अजित पवार म्हणाले की, आज संत तुकाराम महाराजांच्या देहू परिसरात काही भरीव मदत जाहीर करणं अपेक्षित होतं. पण त्याचा अजिबात उल्लेख नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देण्याचं काम सुरू होतं. परंतु, पंतप्रधानांच्या हस्ते त्या स्मारकाचं भूमिपूजन झालं, त्या संदर्भात पुढील काहीही निधी किंवा कामाबद्दल काहीही झालं नाही. बोलणाऱ्यांच्या वाणीला आणि ऐकणाऱ्यांच्या कानाला बरं वाटावं म्हणून या सरकारने आतापर्यंत अनेक घोषणा गेल्या आठ नऊ महिन्यात केलेल्या पाहिल्या. अन् त्याचीच पुनरावृत्ती आज अर्थसंकल्पात पाहायला मिळाली. माझ्याकडे एक वर्षापूर्वीच्या अर्थसंकल्पाची प्रत आहे. त्यात गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री आम्ही मांडलेली होती. आणि यांनी पंचामृत आणलं. मुळात अमृत कुणीही पाहिलेलं नाही, फक्त ऐकत आलो आहोत. तसंच हे विकासाचं पंचामृत कधीही दिसणार नाही. फक्त ऐकत राहायचं आणि जनतेला विकासाच्या स्वप्नात फिरवून आणण्याचा प्रयत्न करायचा. 2014 पासून आतापर्यंत केलेल्या आधीच्या घोषणांचं काय झालं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का, महाराष्ट्रातले उद्योग बाहेर चाललेत ते थांबवण्यासाठी कोणतीही घोषणा नाही. विकासकामांना निधी खर्च होत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.


























































