
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील मोटारीवर संभाजीनगरमध्ये झालेल्या दगडफेकीचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज तीव्र शब्दांत निषेध केला. लोकशाहीमध्ये सत्ता मिळाल्यानंतर हुरळून न जाता जमिनीवर पाय ठेवून सत्ता राबवायची असते, अशा शब्दांत कोणाचेही नाव न घेता शिंदे गटाचा समाचार घेतला.
विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. शिवसंवाद यात्रेत संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील मोटारीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या दौऱयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदित्य ठाकरे काम करीत आहे हे काहींना बघवत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना असे प्रकार आवडत नाही, असे ते म्हणाले. प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे, मतमतांतरे असू शकतात. त्याबाबतीत त्यांनी त्यांचे विचार मांडावेत. पण दगडफेक, शाईफेक असे कायदा हातात घेण्याचे प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनीही करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्राची परंपरा असणाऱया लावणीमधील अश्लील नृत्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सर्वांना पाहता येईल, अशी लावणी झाली पाहिजे. त्यामध्ये अश्लील नृत्य होता कामा नये. अन्यथा वेळ पडल्यास आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कायदा करण्यास भाग पाडू, असा इशारा पवार यांनी दिला. ग्रामीण भागात लावणीचे कार्यक्रम होतात. ती एक प्रकारे स्पर्धाच लागलेली असते. पण काही जिह्यांमध्ये लावणीला बंदी आहे, तर काही जिह्यांत चालू आहे. त्यामुळे नक्की काय आहे याची आपण माहिती घेणार आहोत, मात्र लावणीमध्ये अश्लील नृत्य होता कामा नये. महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती टिकली पाहिजे, कोणी चुकीचा वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे, असे अजीत पवार यांनी स्पष्ट केले.

























































