भाजपा दल नहीं दलाल है। अखिलेश यादव यांची बोचरी टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बटाट्याचे भाव कमी झाल्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आज संसदेत देखील बटाटाच्या कमी झालेल्या दराचा मुद्दा गाजला. विरोधकांनी संसद परिसरात बटाटा उत्पादकांसाठी आंदोलन केले. उत्तर प्रदेशमधील बटाटा उत्पादक शेतकरी देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. ”शेतकरी आणि शेती विरोधी असलेले हे भाजप सरकार पूर्णपणे बेजबाबदारपणे वागत असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. भाजपला केवळ आपल्या राजकीय सत्तेशी देणेघेणे आहे. या पक्षाच्या नेत्यांकडे निवडणुकीच्या प्रचारासाठी पुरेसा वेळ आहे, मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी व्यक्त केली आहे.

भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, शेतीमालाचे भाव जाणीवपूर्वक इतके पाडले जात आहेत की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघू नये. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अखेर कंटाळून शेती सोडण्यास तयार होईल आणि आपली जमीन भाजप समर्थक श्रीमंतांना कवडीमोल भावात विकण्यास मजबूर होईल. अशा प्रकारे आजचा जमिनीचा मालक असलेला शेतकरी उद्या स्वतःच्याच शेतात मजूर बनेल, अशी भीती त्यांनी या ट्विटमधून व्यक्त केली आहे.

”भाजपचे ध्येय शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून अन्नधान्य उत्पादनावर नियंत्रण मिळवणे हेच आहे. एकदा ताबा मिळाला की, जनतेकडून पिकांच्या मनमानी किमती वसूल केल्या जातील. याच कारस्थान अंतर्गत कधी भू-संपादन विधेयक, कधी तीन ‘काळे’ कृषी कायदे, तर कधी शेतीसाठी घातक असणारी अमेरिकन डील लादण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असेही अखिलेश यादव म्हणाले.

भाजप पक्ष नव्हे, दलाल

जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर तो दिवस दूर नाही जेव्हा आजचा शेतकरी उद्या आपल्याच शेतातील उत्पादन विकत घेण्यास विवश होईल. भाजप हा राजकीय पक्ष नसून ‘दलालांचे’ काम करत असल्याची बोचरी टीका अखिलेश यादव यांनी केली.